ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वर्दळीचे रस्ते, गर्दीची ठिकाणे येथे शौचालयांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. विशेषत: महिला वर्गाची कुंचबना होते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने खासगी लोकसहभागातून (पीपीपी) शहरात १३ ठिकाणी कंटेनर शौचालय उभारणीचा निर्णय घेतला होता. या संबंधीच्या प्रस्तावास आता प्रशासकीय स्थायी समितीने मान्यता दिल्याने कंटेनर शौचालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील नऊशेपैकी सातशे सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली. त्यासाठी राज्य शासनाने ५ कोटी ४५ लाखांचा निधी दिला होता. याशिवाय, शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये कंटेनर शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. असे असले तरी ठाणे शहरातील वर्दळीचे रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी शौचालये नाहीत. ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे. नागरिक कामानिमित्त शहरातील रस्त्यांवरून प्रवास करता. तसेच सुट्टीच्या दिवशी नागरिक माॅल, बाजारपेठ अशा ठिकाणी फिरायला जातात. परंतु अशा ठिकाणी शौचालयांची सुविधा नसल्यामुळे अनेकदा नागरिकांची गैरसोय होते. महिलांची कुचंबना होते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने १३ कंटेनर शौचालये उभारणीचा निर्णय घेतला होता. या प्रस्तावास ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली होती. त्यानंतर पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. यातून ठेकेदार निवडीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने प्रशासकीय स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्यास समितीने मान्यता दिल्याने कंटेनर शौचालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अशी असतील शौचालये
ठाणे शहरातील १३ वर्दळीच्या ठिकाणी कंटेनर शौचालये उभारण्यात येणार आहेत. ही कंटेनरच्या स्वरूपातील लहान आकाराची शौचालय असणार आहेत. त्याच्या बाजूलाच व्यवसाय करण्यासाठी व्यवसायिक परवाना दिला जाणार आहे. ही सर्व शौचालय वातानुकूलित असतील आणि येथे नागरिकांकडे कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. या शौचालयाची देखभाल व्यवसायधारक ठेकेदाराच्या मार्फत करण्यात येणार आहेत.
कुठे असतील शौचालये
ठाणे शहरातील रहेजा गार्डन, लोकमान्य बस डेपो, तीन हात नाका, नितीन कंपनी, रायलादेवी तलाव, कचराळी तलाव, मासुंदा तलाव, उपवन तलाव, कॅडबरी सिग्नल, वसंतविहार नाका, विवियाना मॉल पदपथ, अंबिका नगर आणि वृंदावन अशा एकूण १३ ठिकाणी शौचालये उभारण्यात येणार आहे.