जमीन खरेदी प्रकरणात कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांची आर्थिक फसवणूक झाली. आता या प्रकरणी उल्हासनगरमधील पिता पुत्राला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. मोहन रूपानी व भारत रुपानी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन गवळी यांचे वडील अनंता गवळी यांनी उल्हासनगरमधील पिटूमल रूपानी यांच्याकडून ४ वर्षापूर्वी कल्याण पूर्वेतील नांदिवली येथे ६६,००० चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. दरम्यानच्या काळात खरेदीदार अनंता यांचे निधन झाले. त्यापाठोपाठ पिटूमल यांचेही निधन झाले. याचा पिटूमल यांचे नातेवाईक मोहन व भारत रूपानी यांनी गैरफायदा घेतला. तसेच मृत पिटुमल व अनंता यांच्या विक्रीची बनावट कागदपत्र व ओळखपत्र तयार करून सरकारी कागदपत्रांमध्ये हेराफेरी केली आणि जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला.

सरकारी कागदपत्रात हेराफेरी करून फसवणूक

कायद्याने पिटूमल यांनी अनंता गवळींना विकलेली जमीन वारस म्हणून नवीन गवळी यांच्या नावावर होणे आवश्यक होते. हा हेराफेरीचा प्रकार लक्षात आल्यावर नवीन गवळी यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. चौकशीत मोहन व भारत रूपानी यांनी सरकारी कागदपत्रात हेराफेरी करून तक्रारदार नवीन गवळी यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा : बीडमध्ये वक्फ जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप, एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षासह वडिलांविरुध्द गुन्हा दाखल

गुन्हे शाखेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मोहन व भारत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोहन व भारत फरार झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ५ वर्षानंतर अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police arrest father and son in fraud case of shivsena ex corporator pbs
First published on: 22-01-2022 at 12:25 IST