लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवर कथित खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा आणि खंडाणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पांडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात जबाब नोंदविण्यासाठी संजय पांडे हे बुधवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात दाखल झाले असून पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू झाले आहे. पांडे यांना याबाबत विचारले असता, पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत, त्यांनाच माहित अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुंबई येथे व्यवसायिक संजय पुनमिया वास्तव्यास आहेत. मिरा भाईंदरमध्ये काही विकासकांनी युएलसीच्या सवलतीसाठी बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती.या बनावट पत्राच्या आधारे विकासकांनी महापालिकेकडून परवानग्या घेऊन इमारतींचे बांधकाम केले आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली होती असा आरोप आहे. याप्रकरणी २०१६ मध्ये ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संजय पुनमिया यांच्याविरोधात देखील हा गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास २०२१ मध्ये पुन्हा सुरू करून राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप पुनमिया यांनी केला होता. तसेच, शासनाचे खोटे पत्र तयार करून विशेष सरकारी वकिल नेमण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आणखी वाचा-ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता पांडे यांचा जबाब घेण्यास सुरुवात झाली आहे. पांडे यांना याबाबत विचारले असता पोलिसांनी आरोप दाखल केले आहेत, त्यांनाच माहित असे पांडे म्हणाले.