ठाणे : भारतातील एक नामवंत ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्ट कंपनीकडून नष्ट करण्यासाठी दिलेल्या कालबाह्य झालेल्या अन्नधान्य तसेच इतर साहित्यांची दुसऱ्या कंपनीच्या नावे विक्री करणाऱ्या दोनजणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शीळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघे गेल्या चार वर्षांपासून कालबाह्य झालेल्या साहित्याची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोहमद इरफान मोहमद मुनीर चौधरी (४१) आणि मोहमद अक्रम मोहमद इस्माईल शेख (५८) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील मोहमद चौधरी हा मुंबईतील साकीनाका भागात तर, मोहमद शेख हा भिवंडीतील गौरीपाडा भागात राहतो. हे दोघे इको स्टार रिसायकलिंग अण्ड ई-वेस्ट रिसायकलिंग कंपनीचे मालक असून त्यांनी शीळ परिसरातील दहीसर नाका येथील आरिफ कंपाऊंडमध्ये गोदाम क्रमांक सहा भाड्याने घेतले होते. हे गोदाम ५३ हजार चौरसफुट इतके आहे.
फ्लिपकार्ट कंपनीकडून कालबाह्य झालेले साहित्य नष्ट करण्याचे काम इको स्टार रिसायकलिंग कंपनीला दिले जाते. मात्र, हे साहित्य नष्ट करण्याऐवजी ते दुसऱ्या कंपनीच्या नावाने बाजारात विकले जात असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने शीळ येथील इको स्टार रिसायकलिंग कंपनीच्या गोदामावर धाड टाकली.
त्यावेळी फ्लिपकार्ट कंपनीकडून नष्ट करण्यासाठी पाठविलेले सर्व प्रकारचे अन्नधान्य, कडधान्य, विविध कंपन्यांचे पीठ, साखर, तांदुळ, सुका मेवा, सॅनेटरी पॅड, धुलाई (वॉशिंग)पावडर, साबण असा साहित्य नष्ट करण्याऐवजी त्याच्यावरील मुळ कंपनीचे आवरण काढले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच आवरण काढल्यानंतर त्यातील १२ टन वजनाचे, ३० लाख रुपये किंमतीचे साहित्य साध्या प्लॅस्टिक पिशव्या आणि गोण्यांमध्ये भरून विक्रीसाठी साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर नवकार रिसायकलिंग दहिसरमोरी, शीळ डायघर, ठाणे या कंपनीचे बनावट वाहतूक चलन तयार करून त्याद्वारे भिवंडी आणि इतर परिसरात या साहित्याची विक्री केली जाते, अशी बाबही पोलिसांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीचे मालक मोहमद चौधरी आणि मोहमद शेख या दोघांना अटक केली. याप्रकरणी शीळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाने दोघांना १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.