ठाणे : व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून मुलींचे छायाचित्र ग्राहकांना पाठवून त्यांना मुलगी पसंत करण्यास सांगितली जात होती. मुलगी पसंत केल्यानंतर ग्राहकांकडून १५ हजार रुपये घेत तरुणींना वेश्या व्यवसायाच्या दलदलीमध्ये ढकलणाऱ्या महिला दलालांवर ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. याप्रकरणात पोलिसांनी एका महिला दलालला अटक केली असून तिच्या महिला साथिदारीचा पोलीस शोध घेत आहेत.
व्हाॅट्सॲपवर छायाचित्र पाठवून एक महिला तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करुन महिलेशी संपर्क साधला. तिने बनावट ग्राहकाला तरुणींचे छायाचित्र व्हाॅट्सॲपवर पाठविते असे सांगत तसेच १५ हजार रुपयांची मागणी केली. बनावट ग्राहकाने त्या महिलेला ठाण्यातील एका हाॅटेलमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार, त्या दलाल महिलेची सहकारी दोन तरुणींना घेऊन ठाण्यातील त्या हाॅटेलमध्ये आली.
महिला तेथे तरुणींना घेऊन आल्यानंतर बनावट ग्राहकाने पोलिसांना काॅल करुन त्या बाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ हाॅटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी त्या दलाल महिलेला पैसे घेताना रंगेहात ताब्यात घेऊन अटक केली. तसेच तिच्या तावडीतून त्या दोन तरुणींची सुटका केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर महिलेच्या साथिदारीचा पोलीस शोध घेत आहेत.