ठाणे : ठाणे पोलिसांनी दीड हजार किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट केला आहे. यामध्ये सर्वाधिक साठा गांजा या अमली पदार्थाचा आहे. त्यापाठोपाठ चरस, एमडी या अमली पदार्थांचाही सामावेश आहे. तळोजा येथे कायदेशीरप्रक्रिया पूर्ण करून या साठ्याचा नाश करण्यात आला. अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस ठाण्यातील पथके, अमली पदार्थ विरोधी पथकांकडून कारवाई करण्यात येते. या कारवाईमध्ये पोलिसांकडून अमली पदार्थांचा साठा जप्त केला जातो.

अमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन नष्ट केला जात असतो. त्यानसार, ठाणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत दाखल ६० गुन्ह्यांतील एक हजार ५९२ किलो ७५३ ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ साठा नष्ट केला आहे. तळोजा एमआयडीसी भागात हा साठा नष्ट करण्यात आला. ठाणे पोलिसांनी नष्ट केलेल्या साठ्यामध्ये सर्वाधिक साठा गांजा या अमली पदार्थाचा होता. गांजा विक्री आणि सेवन प्रकरणात ४० गुन्हे दाखल होते.

त्यामध्ये पोलिसांनी १ हजार ५५२ किलो ७७६ ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ नष्ट केला. तर चरस विक्री आणि सेवन प्रकरणात आठ गुन्हे दाखल असून यात २५ किलो २६७ ग्रॅम, एमडी प्रकरणात १० गुन्हे दाखल असून १२ किलो आठ ग्रॅम साठा, अफीम प्रकरणात एक गुन्हा दाखल असून एक किलो ५५० ग्रॅम आणि इफिड्रीन या अमली पदार्थ प्रकरणात एक गुन्हा दाखल असून एक किलो १५२ ग्रॅम साठा असा एकूण एक हजार ५९२ किलो ७५३ ग्रॅम साठा पोलिसांनी नष्ट केला आहे.