scorecardresearch

डोंबिवलीत आयसीआयसीआय बँकेची साडे तीन कोटीची फसवणूक ; रिलेशन मॅनेजर विरोधात गुन्हा

सन २०१९ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत डोंबिवली एमआयडीसीतील ममता रुग्णालया शेजारील आयसीआयसीआय बँक शाखेत हा गैरप्रकार सुरू होता.

icici bank
(संग्रहित छायाचित्र)

डोंबिवली– डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीतील आयसीआयसीआय बँकेची याच बँकेतील रिलेशन मॅनेजर आणि त्याच्या साथीदारांनी बँक खातेदारांच्या व्यवहारात बेकायदा आर्थिक उलाढाली करून बँकेची आणि खातेदारांची तीन कोटी ५७ लाख ४९ हजार १४१ रुपयांची फसवणूक केली आहे.

या फसवणूक प्रकरणी आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक पवन अशोक माळवी (४४) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात बँकेचे रिलेशन मॅनेजर आशीष याख्मी व त्याच्या इतर साथीदारांविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

नक्की वाचा >>Maharashtra News Live Updates : “मी मोदींना इशारा देतोय, महाराष्ट्राच्या गळ्याला नख लावू नका” अनंत गीतेंचं टीकास्त्र; महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट्स एकाच क्लिकवर!

सन २०१९ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत डोंबिवली एमआयडीसीतील ममता रुग्णालया शेजारील आयसीआयसीआय बँक शाखेत हा गैरप्रकार सुरू होता.

पोलिसांनी सांगितले, आयसीआयसीआय बँकेचे रिलेशन मॅनेजर आशीष याख्मी आणि त्याच्या साथीदारांनी संगनमत करून आयसीआयसीआय बँक खातेदारांच्या परवानगी शिवाय ग्राहकांच्या खात्यात असलेल्या रकमा, त्यांच्या ठेव मुदतीच्या पावत्यांवर स्वताचे मित्र, वडिल यांच्या नावे व्यवहार करून काही रकमा काढून घेतल्या. ज्या ग्राहकांनी गुंतणुकीसाठी धनादेश दिले. त्या धनादेशांवर खाडाखोड करून, नावे बदलून, बनावट स्वाक्षऱ्या करून त्या धनादेशांवरील रकमा लबाडीने स्वताच्या नावे काढून घेतल्या. हे सगळे व्यवहार सुरू असताना बँक आणि ग्राहकांना कोणताही सुगावा लागणार नाही याची काळजी आरोपी आशीष व त्याचे साथीदार घेत होते. ग्राहकांची खाती, त्यांच्या ठेव रकमांच्या बदल्यात आयसीआयसीआय प्रुडेन्शीअल पाॅलिसी काढल्या. बँकेच्या अंतर्गत तपासणीत हा गैरव्यवहार उघडकीला आला.  याप्रकरणाची बँकेने स्वतंत्र चौकशी केली.त्यावेळी रिलेशन मॅनेजर याख्मी व त्याच्या साथीदारांनी हा गैरप्रकार केल्याचे पुढे आले. बँक आणि ग्राहकांची फसवणूक केल्याने बँकेने तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल पडवळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-07-2022 at 15:43 IST