scorecardresearch

डोंबिवली, कल्याणमध्ये गुन्हेगारांची पोलिसांकडून धिंड ; व्यापारी, रहिवाशांमध्ये समाधान

कल्याण पूर्वेत अशाप्रकारे गुन्हेगारांच्या धिंड काढण्यात येत असल्याने रहिवासी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकून पोलिसांनी त्यांची ते दहशत पसरवणाऱ्या भागात दिवसा धिंड काढण्यास सुरूवात केली आहे.

कल्याण: कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात दहशत माजवून स्थानिकांना त्रास देणे, शस्त्रांचा वापर करून रात्रीच्या वेळेत परिसरात धिंगाणा घालणे. अशा कल्याण परिसरातील १२ जणांवर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायद्याने कारवाई केली आहे. याचे पुढचे पाऊल म्हणजे अशा सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकून पोलिसांनी त्यांची ते दहशत पसरवणाऱ्या भागात दिवसा धिंड काढण्यास सुरूवात केली आहे.

सराईत गुन्हेगाराला पोलिसांकडून हातात बेड्या घातल्या जातात. तो ज्या विभागात दहशत माजवतो, त्या भागात त्याला फिरवण्यात येते. स्वताला भाई, दादा समजणारा गुन्हेगार खाली मान घालून पोलिसांच्या घेरावात फिरत असतानाचे दृश्य शहराच्या विविध भागात दिसत आहे.

व्यापारी, सराफ, दुकानदारांना दमदाटी करून हप्ते घेणारे दादा, भाई विरोधात तक्रार येताच पोलिसांनी त्यांना अटक करण्यास सुरूवात केली आहे. अशा सराईत गुन्हेगारांवर अनेक गुन्हे असतील तर त्यांचे अहवाल वरिष्ठांना पाठवून त्यांना तडीपार किंवा संघटित गुन्हेगारी कायद्याने त्यांच्यावर कारवाई करून त्यांची रवानगी एक ते दोन वर्षासाठी पुणे अन्य भागातील तूरूंगात केली जात आहे, असे साहाय्यक आयुक्त उमेश माने पाटील यांनी सांगितले.

ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांच्या आदेशावरून कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हद्दीतील गुन्हेगारांना मोक्का लावला आहे. अशा गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकून ते दहशत पसरवत असणाऱ्या, राहत असलेल्या भागात त्याची धिंड काढत आहेत. कल्याण पूर्वेत अशाप्रकारे गुन्हेगारांच्या धिंड काढण्यात येत असल्याने रहिवासी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कल्याण डोंबिवली शहरात पोलीस उपायुक्त वाय. सी. पवार होते त्यावेळी गुन्हेगारांना अशाप्रकारे शिक्षा केल्या जात होत्या, अशी आठवण काही जुन्या जाणत्यांनी सांगितली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane police take action against 12 criminals under organised crime act zws

ताज्या बातम्या