raksha bandhan : ठाणे – रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्यानिमित्त बाजारात राखी खरेदीला महिलांची गर्दी होऊ लागली आहे. यावर्षी लहान मुलांसाठी विविध आकर्षक अशा राख्या उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये ॲपल फोनची प्रतिकृती असलेली राखी त्यासह विविध कार्टून्सच्या राख्यांचा समावेश आहे . यात, विशेष म्हणजे थेट भेटवस्तू समाविष्ट असलेल्या राख्या सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहेत.

रक्षाबंधननिमित्त बाजारात गेल्या आठवड्याभरापासून राख्या उपलब्ध झाल्या आहेत. यंदा राख्यांमध्ये विविध प्रकार बाजारात आलेले पाहायला मिळत आहेत. यामध्ये यंदा लहान मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर्ससह अनेक नावीन्यपूर्ण राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेषतः ॲपल फोनची प्रतिकृती असलेली राखी आणि सुपरहिरो थीम राख्या मुलांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. याशिवाय, थेट भेटवस्तू समाविष्ट असलेल्या राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या भेटवस्तूच्या बाॅक्समध्ये राखीसह की-चेन, पेनड्राईव्ह, मिनी टॉर्च, चॉकलेट बॉक्स, परफ्यूम, पुरुषांचे पाकिट अशा विविध साहित्यांचा यात समावेश असतो. हे भेटवस्तूंचे बॉक्स ग्राहकांचे विशेष लक्ष वेधत आहेत.

ज्या बहिणींचे भाऊ बाहेरगावी राहतात, विशेषकरुन त्या बहिणींनी भेटवस्तू असलेल्या राखीच्या बॉक्सची खरेदी केल्याची माहिती ठाण्यातील विक्रेत्यांनी दिली. हे भेटवस्तू असलेल्या राखीचे बॉक्स ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. प्रत्येक भेट वस्तूनुसार या राखी बॉक्सची किंमत ठरवण्यात आली आहे. हे बॉक्स ४०० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या भेटवस्तूच्या बॉक्सला देखील महिलांकडून उत्तम मागणी असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले. तर, लहान मुलांसाठी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या राखींसह देखील विविध आकर्षक अशा भेटवस्तू असल्याचे दिसत आहेत. वाहनाची प्रतिकृती असलेले की-चेन, स्पीनर, घड्याळ असे विविध भेटवस्तू त्यात पाहायला मिळत आहेत.

कुंदन राखीला महिलांची पसंती

विविध डिझाईन्सच्या राख्यांसह आता, बाजारात कुंदण राखीला देखील मोठी पसंती मिळत आहे. हिरे, माणिक मोती याचा वापर करुन तयार केलेल्या या कुंदण राख्या आकर्षित वाटतात. या राखीची विक्री ६० रुपयांपासून केली जात आहेत. तर, ॲपल मोबाईलची प्रतिकृती असलेली राखी १२० रुपयाला विक्री करण्यात येत आहे. तर, लहान मुलांसाठी कार्टून थीमच्या राख्यांची विक्री ६० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत केली जात आहे, अशी माहिती ठाण्यातील राखी विक्रेते धीरज गुप्ता यांनी दिली.