ठाणे : ठाण्यात अपघात सत्र सुरूच असल्याचे समोर येत आहे. शनिवारी रात्री घोडबंदर भागात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत गजल तुटेजा (२१) यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात झाली आहे. शनिवारी सकाळी अशाच एका अपघात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ठाण्यात रस्ते अपघात सत्र केव्हा थांबेल असा प्रश्न चालकांना पडला आहे.
घोडबंदर भागात गजल तुटेजा या राहत होत्या. शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास त्या घोडबंदर मार्गावर ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत होत्या. त्या नागला बंदर भागात आल्या असता, एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात गजल यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाल्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तिचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला होता. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी सकाळी अशाच प्रकारे एका अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. ठाणे पोलीस दलात पोलीस नाईक पदावर कार्यरत असणारे सुरेश भालेराव यांचा मृत्यू झाला.
सुरेश भालेराव हे शनिवारी सकाळी १०.३० वाजता कामावर जाण्यासाठी निघाले. दुचाकीने ते कामावर जात होते. कॅडबरी चौकात त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यांच्या दुचाकीला डम्पने धडक दिली. या अपघातात ते दुचाकीवरून खाली पडले आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. याठिकाणी असलेल्या नागरिकांनी अपघात पाहून तात्काळ धाव घेतली.
कॅडबरी चौकातील वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी पोलिस कर्मचारी आणि वाहतूक सेवक तैनात असतात. त्यांनीही हा अपघात पाहून धाव घेतली. सुरेश हे रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडले होते. नागरिक आणि चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. या रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचारही सुरू केले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.