ठाणे- नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी दिवाळी दरम्यान तसेच मे महिन्याच्या कालावधीत साहित्ययात्रा या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या पूस्तक प्रदर्शनाला यंदा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. काही मैदानात आंबा महोत्सव तर, काही मैदानात ग्राहक पेठा सुरु आहेत. तर, बंदिस्त सभागृहात किंवा खासगी मैदानात पूस्तक प्रदर्शन भरविण्याचे ठरविले तर, त्या जागेचे भाडेदर हे परवडणारे नाही अशी खंत आयोजकांनी व्यक्त केली आहे. यंदा पूस्तक प्रदर्शन होत नसल्याने वाचक प्रेमींमधून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिवाळी तसेच उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत साहित्ययात्रा या संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात पुस्तक प्रदर्शन भरविण्यात येते. बालसाहित्यापासून ते अगदी कादंबरी, कथासंग्रह, धार्मिक ग्रंथ आणि विविध इंग्रजी भाषेतील विविध पुस्तकांचा समावेश या प्रदर्शनात पाहायला मिळतो. त्यामुळे या ग्रंथ प्रदर्शनाला केवळ ठाणे शहरातीलच वाचकप्रेमी नाही तर, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत तसेच नवी मुंबईतील वाचकप्रेमी देखील वाचकप्रेमी भेट देऊन पुस्तक खरेदीचा आनंद लुटत.

साहित्ययात्रा ही संस्था गेले दहा वर्षांपासून पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. नौपाड्यातील सरस्वती शाळेच्या आवारात, गावदेवी मैदान, घंटाळी मैदान, कामठे मैदान किंवा खेवरा सर्कल परिसरातील मैदान या ठराविक जागांपैकी जी जागा उपलब्ध होईल त्या जागेवर आयोजकांकडून हे पुस्कक प्रदर्शन भरविले जात. सद्यस्थितीला सरस्वती शाळेत बांधकाम सुरु आहे तर, गावदेवी मैदान आणि कामठे मैदानात आंबा महोत्सव आणि घंटाळी मैदानात ग्राहकपेठ सुरु आहे. तर, खेवरा सर्कल परिसरातील मैदानात देखील इतर वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यामुळे यंदा जागे अभावी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. बंदिस्त सभागृह किंवा खासगी मैदानाचे भाडेदर परवडणारे नसल्यामुळे अशा ठिकाणी पुस्तक प्रदर्शन भरविणे शक्य होत नसल्याची खंत आयोजकांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेने ग्रंथ प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी

ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर असून प्रचंड मोठ शहर आहे. या शहारात पुस्तक प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध होत नाही ही खरंच धक्कादायक बाब आहे. मुबंई शहरात महापालिकेच्या वतीने काही नाट्यगृहात तसेच तरण तलावाच्या ठिकाणी विविध प्रकाशकांच्या पुस्तकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. असाच उपक्रम ठाणे महापालिकेने देखील नाट्यगृहांमध्ये करावा अशी मागणी साहित्ययात्रा संस्थेचे संचालक शैलेश वाझा यांनी केली आहे.

आजच्या काळात पुस्तक ऑनलाईन उपलब्ध होत असली तरी, पुस्तक खरेदी करताना त्यातील प्रस्तावना वाचून त्यानंतर, ते पुस्तक खरेदी करण्याचा आनंद हा वेगळा असतो. पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध सवलती वाचकप्रेमींना मिळतात. त्यामुळे पुस्तक प्रदर्शन भरणे गरजेचे आहे. – विनायक गोखले, ग्रंथमित्र