* गृहसंकुलाच्या उभारणीत ठाणे राज्यात दुसरे ! * कोकण विभागात ठाणे अव्वल

ठाणे – पायाभूत सुविधांची उभारणी, देशातील अनेक विकासात्मक प्रकल्पांची ठाणे जिल्ह्यात सुरु असलेली कामे आणि जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये मुंबईच्या तुलनेत असलेली शांतता यामुळे गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत अनेक नागरिकांनी ठाणे जिल्ह्यात राहण्यास पसंती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात गेल्या आठ वर्षात सर्वाधिक गृहसंकुलांची उभारणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्हा दुसरा असून तब्बल ६ हजार ७४६ मोठ्याला गृहसंकुलांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाला नुकतेच आठ वर्ष पूर्ण झाले. याच पार्श्वभूमीवर महारेराकडून आतापर्यंत झालेल्या गृहसंकुलांच्या नोंदणीची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये पुणे प्रथम क्रमांकावर आहे तर राज्यातून ठाणे जिल्हा दुसऱ्या क्रमांवर आहे.

राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राच्या संनियंत्रणासाठी २०१७ ला महारेराची स्थापना करण्यात आली. केंद्र शासनाच्या स्थावर संपदा ( विनियमन व विकास) अधिनियम २०१६ अन्वये या विनिमयामक प्राधिकरणाची स्थापना करणाऱ्या काही महत्त्वाच्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक राज्य होते. नुकताच काही दिवसांपूर्वी महारेराचा आठवा वर्धापन दिन झाला. याच पार्श्वभूमीवर महारेराकडून गेल्या आठ वर्षात राज्यात विविध विभागांमध्ये उभे राहिलेल्या आणि महारेराकडे नोंदणी झालेल्या गृहसंकुलांची आकडेवारी जाहीर केली आहे.

राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांनी ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर ५० हजार नोंदणीकृत प्रकल्पांचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. सध्या महारेराकडे एकूण ५० हजार १६२ गृहनिर्माण प्रकल्प नोंदणीकृत आहेत. महाराष्ट्रातील या प्रकल्पांपैकी १२ हजार ७८८ गृहनिर्माण प्रकल्प एकट्या पुणे जिल्ह्यातील असून यानंतर ठाणे जिल्ह्यातील ६ हजार ७४६, मुंबई उपनगरात ५ हजार ९०७, रायगड जिल्ह्यातील ५ हजार ३६० अशी प्रकल्पांची संख्या आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ वर्षात तब्बल ६ हजार ७४६ मोठ्याला गृहसंकुलांची उभारणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी मानल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांचा मार्ग हा ठाणे जिल्ह्यातून विकसित होताना पाहायला मिळत आहे. कल्याण, भिवंडी, अंबरनाथ आणि ठाणे या तालुक्यांमधून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई – वडोदरा राष्ट्रीय महामार्ग आणि समर्पित मालवाहतूक मार्गिका (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प आकार घेत आहेत. तर सर्व शहरांची जोडणी अंतर्गत रस्ते, विविध उड्डाणपूल यामुळे काही अंशी जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था नव्याने आकार घेत आहे. तर याच बरोबर अनेक शैक्षणिक संस्था देखील जिल्ह्यात असल्याने अनेक कुटुंब येथील विविध शहरांमध्ये वास्त्यव्याला पसंती देत आहेत. तर मुंबईच्या तुलनेत अधिक निसर्गसंपन्न आणि शांतता असल्याने अनेक नागरिक ठाण्यातील विविध शहरांमध्ये राहण्यास पसंती देत आहेत. याचमुळे जिल्ह्यात गेल्या आठ वर्षात तब्बल ६ हजार ७४६ मोठ्याला गृहसंकुलांची उभारणी झाली आहे.

प्रकल्पांचा जिल्हानिहाय तपशील

( कोकण परिसर- 23,770 )

मुंबई शहर- 1284

मुंबई उपनगर- 5907

ठाणे- 6746

रायगड- 5360

पालघर- 2899

रत्नागिरी- 1087

सिंधुदुर्ग- 487

काही वर्षांपूर्वी मुंबई महानगर किंवा पुणे परिसरापुरते काही प्रमाणात मर्यादित असलेले स्थावर संपदा क्षेत्र आता राज्यात सर्वत्र विस्तारते आहे. राज्यभरातील घरांची सततची वाढती मागणी, हे राज्याच्या सर्वांगीण विकासाचे द्योतक आहे. – मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा