metro news, mmrda news : ठाणे : घोडबंदर मार्गावरील सेवा आणि मुख्य रस्ते जोडणी कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढेल आणि स्थानिक नागरिकांसाठी हा प्रकल्प डोकेदुखी ठरेल, अशी भिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळा माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा (Naresh Manera) यांनी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ आता याच मार्गावर कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या आठ मेट्रो स्थानकांखाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यावरून मणेरा यांनी संताप व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर टिका केली आहे.

घोडबंदर रोडवरील मेट्रो ४ स्थानकांचे जिने मुख्य रास्ता आणि सेवारस्ता विलिनीकरणाच्या मध्येच उतरत असल्याने ते प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचेही लेखीपत्र आणि छायाचित्रांसह एमएमआरडीए अधिकाऱ्यांचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर आता संबंधितांना उपरती होऊन जाग आल्याचे दिसते. मात्र पुन्हा एकदा येथील आमदाराने कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या आठ मेट्रो स्थानकांच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे करून प्रवासी उतरण्याच्या रस्त्याच्या मधोमध आलेल्या जिन्यालगत पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सेवा रस्ता आरक्षित करून तेथून बसेस, एसटी, रिक्षा व टॅक्सी या वाहनांखेरीज इतर वाहने येऊ नयेत असे सूचना फलक लावण्याचे निर्देश एमएमआरडीए, महापालिका आणि वाहतूक अधिकाऱ्यांना पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. सगळेच मेट्रो प्रवासी काही बस, एसटी, रिक्षा किंवा टॅक्सीने जाणारे नसतात. अनेकजण पायीही जाणारे असल्याने त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे आमदारांची हि सूचना किंवा कल्पनासुद्धा अजब, अतर्क्य आणि अविवेकी आहे असेही नरेश मणेरा यांनी सांगितले.

बॉटलनेक होऊन प्रचंड वाहतूककोंडी होणार

महंमद तुघलकी निर्देशामुळे घोडबंदर मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता विलिनीकरण करण्याच्या कामाचा बोऱ्या वाजला असून त्यासाठीच्या ६०० कोटींच्या खर्चास जबाबदार कोण, मेट्रो जिने पूर्वीच्या सेवा रस्त्याजवळ आणि आता रस्ता विलिनीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध उतरत असल्याचे माहित आहे. तरीही मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता विलिनीकरणाचे काम का करण्यात आले, असा प्रश्न नरेश मणेरा यांनी उपस्थित केला आहे. मेट्रो स्थानकाचे जिने उतरण्याच्या ठिकाणी प्रवासी थांबे करून त्याठिकाणाहून फक्त बसेस, एसटी, रिक्षा आणि टॅक्सी या वाहनांचीच वाहतूक असे फलक लावूनही धोकादायक ठरणार नाही का आणि कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या आठ मेट्रो स्थानकांवर दोन्ही बाजूस मागे-पुढे असे एकूण २८ उतरते जिने असल्याने या थांब्याच्या ठिकाणी आरक्षित सेवा रस्ता ठेवल्यास बॉटलनेक होऊन प्रचंड वाहतूककोंडी होणार असल्याने रस्ता विलीनीकरणाचा मूळ उद्देशच असफल होणार नाही का, असा प्रश्नही मणेरा यांनी उपस्थित केला आहे.

तर अपघात झाल्यास जबाबदार कोण ?

मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता विलिनीकरणामुळे घोडबंदर रोड दोन्ही बाजूने एकदिशा मार्ग होणार असल्याने ठाण्याकडे किंवा बोरिवलीकडे जाणाऱ्या येथील नागरिकांना मोठा वळसा घालून जाणे भाग पडणार असल्याने वेळ आणि इंधनही वाया जाणार आहे, त्याचे काय, सध्या घोडबंदर मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता यामध्ये असणारा पदपथच या विलीनीकरणाची कामे करताना हटविण्यात आला आहे. मात्र या पदपथाच्या ठिकाणी उच्च दाबाच्या विद्युत तारा असलेले विद्युत खांब अद्यापही तसेच आहेत. या रस्त्यावरून दिवसरात्र सर्वप्रकारच्या वाहनांची भरधाव वेगाने वाहतूक सुरु असल्याने एखाद्या वाहनाने या विद्युत खांबांना धडक दिल्यास त्यावरील उच्च दाबाच्या विद्युत तारा कोसळून एखादी भयानक दुर्घटना घडून मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण आणि याकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष का असे अनेक प्रश्न निर्माण होत असून संबंधितांनी नागरिकांना त्यांची उत्तरे देणे गरजेचे आहे. हि सर्व वास्तव परिस्थिती लक्षांत घेऊन घोडबंदर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील सेवा रस्ते कायम ठेवण्याची मागणीही नरेश मणेरा यांनी केली आहे.

मंत्री सरनाईकांवर टिका

घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी दूर करण्याच्या नावाखाली येथील आमदाराने घोडबंदर मुख्य रस्त्यात दोन्ही बाजूचे सेवा रस्त्यांचे विलिनीकरण करण्याची विचित्र, विक्षिप्त आणि विवेकशून्य प्रतापी सूचना एमएमआरडीए व महापालिका अधिकाऱ्यांच्या गळी उतरविली. परंतु त्याचे काम सुरु झाल्यावर हा रोगापेक्षा इलाज भयंकर ठरण्याचा इशारा मी त्यावेळी एमएमआरडीए आणि महापालिका अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे दिलेला होता. परंतु मुख्य आणि सेवा रस्ता विलिनीकरणाचे काम सुरूच ठेवण्यात आले. घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीच्या नावाखाली ६०० कोटींच्या या कामातील टक्केवारीवर नजर ठेवून हे काम कोणताही सारासार विचार न करता रेटून नेण्यात येत असल्याचा आरोप नरेश मणेरा यांनी केला आहे. घोडबंदर रोड वरील कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या आठ मेट्रो स्थानकांखाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करण्याची आणखी एक प्रतापी सूचना येथील आमदार आणि परिवहन मंत्र्याने केली असून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे पुन्हा एकदा प्रदर्शन केले आहे.