बदलापूर : आमदार किसन कथोरे यांची चॉकलेटची कंपनी आहे. ते सर्वांना चॉकलेट वाटतात, अशी टीका शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना, ज्यांनी साखर कारखान्याच्या जमिनीवर अतिक्रमण केले त्यांनी चॉकलेटवर बोलू नये अशी खरमरीत टीका आमदार किसन कथोरे यांनी केली होती. मात्र या टीकेनंतर वामन म्हात्रे यांनी आमदार कथोरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. किती खोटे बोलणार, खोटे बोलण्याची वृत्ती सोडा. २० वर्षे काय केले ते सांगा, असे आवाहन म्हात्रे यांनी कथोरे यांना दिले. तसेच हिंमत असेल तर जागेवर या आणि अतिक्रमण दाखवा असे प्रतिआव्हान म्हात्रे यांनी यावेळी बोलताना दिले. प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात होण्यापूर्वीच महायुतीतील नेत्यांमध्ये रंगलेले वाकयुद्ध शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात होण्यापूर्वीच बदलापूर शहरातील भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष टीपेला पोहोचला आहे. आमदार किसन कथोरे आणि शिंदेच्या शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील संघर्ष गेल्या वर्षभरापासून तीव्र झाला आहे. याच संघर्षात एकमेकांवर टोकाची टीका केली जात असल्याचे समोर आले आहे. अशाच एका शिवसेनेचे सभेत वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरेंवर टीका करताना ते चॉकलेट वाटतात, त्यांची चॉकलेटची कंपनी आहे अशी टीका केली होती. त्याबाबत आमदार कथोरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हात्रे यांच्यावर अतिक्रमणाचा आरोप केला. इथेच जवळ रावळगाव शुगर फॅक्टरीची जमीन होती, त्याच्यावर अतिक्रमण करणाऱ्यांनी चॉकलेटवर बोलू नये, अशी थेट टीका किसन कथोरे यांनी केली. या टीकेनंतर वामन म्हात्रे यांनी कथोरे यांच्यावर आगपाखड केली.
हिंमत असेल तर जागेवर या, कुठे बांधकाम केले ते दाखवा, असे आव्हान म्हात्रे यांनी दिले. जागा एकाने लिलावाने घेतली. ती आम्ही भाड्याने घेतली, तिथे भाजीपाला लावतो. खरा लोकप्रतिनिधी असेल तर तिथे या. वामन म्हात्रेही तिथे येणार, तिथे कशी शेती बनवली ते बघा. आम्ही तिथे चांगला भाजीपाला पिकवतो. तुम्ही किती खोट बोलणार, ही वृत्ती सोडा, असेही म्हात्रे यावेळी म्हणाले. तसेच तुमच्यावर टीका करायला लावू नका. निवडणुका येत जात असतात. पण शहरातील वातावरण चांगले राहिले पाहिजे म्हणून आम्ही टीका करत नाही. असेही म्हात्रे पुढे म्हणाले.
२० वर्षे काय केले ?
वामन म्हात्रे यांनी कथोरे यांच्यावर टीका करताना सवाल उपस्थित केले. शहरात करोना काळातल्या टॅक्सचा प्रश्न आहे, त्यावर दिलासा द्या. त्यासाठी विधानसभेत भांडा. शहरात अजुनही पाण्याची अवस्था बिकट का, २० वर्षे विधानसभेत पाण्याची समस्या का सोडवू शकले नाहीत. नदीवर जलपर्णी येते त्यावर काम करण्याची गरज होती. ते आमदाराचे काम होते. त्याचा प्रकल्प अहवाल आम्ही केला. भुयारी गटारीचे नियोजन आम्ही केले. आम्ही पाणी योजनेचे नियोजन केले. तुम्ही काय केले, असा सवाल म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित केला.
