ठाण्यातील वसंत विहार भागातील स्वामी विवेकानंदनगरमधील शिवसेनेचे शाखाप्रमुख मनोज नारकर हे सोमवार पहाटेपासून बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. शिवसेनेचे पदाधिकारी जेरी डेव्हीड यांच्या धमक्या, मनमानी कारभार आणि पक्षविरोधी वागणुकीला कंटाळून जीवन प्रवास संपवत असल्याचे पत्र त्यांनी बेपत्ता होण्यापुर्वी लिहिले होते. पत्रातील गंभीर आरोपांमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा होती. दरम्यान याप्रकरणी आता मोठी घडामोड समोर आली आहे.
भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत उपस्थित करत शाखाप्रमुखाचा शोध घेण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी सभापतींकडे केली होती. यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. दरम्यान बेपत्ता झालेले मनोज नारकर पुन्हा घरी परतले आहेत. मनोज नारकर यांच्या कुटुंबियांनी ते घरी परतल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. इतके दिवस ते कुठे होते याची माहिती घेण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि रत्नागिरी भागात फिरत होतो. कुटुंबीयांची आठवण आल्याने पुन्हा घरी परतल्याचे चितळसर पोलिसांना सांगितले. दरम्यान याआधीही मनोज नारकर अशाच पद्धतीने दोन दिवस गायब झाले होते.
काय आहे प्रकरण –
वसंत विहार भागातील स्वामी विवेकानंदनगरमधील शिवसेनेचे शाखाप्रमुख मनोज नारकर हे बेपत्ता झाल्याप्रकऱणी चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. नारकर यांनी त्यांचा मोबाइल घरीच ठेवला असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांना शक्य झालं नव्हतं. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि मित्रांच्या चौकशीतून पोलीस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांनी घर सोडण्यापुर्वी लिहिलेल्या पत्रात जेरी डेव्हिड यांच्यावर केलेल्या आरोपामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार डावखरे यांनी ठाणे शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला होता.

मनोज नारकर यांनी शिवसेनेचे पदाधिकारी जेरी डेव्हिड याच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याचे मित्र आणि नातेवाईकांना त्रास दिला जात आहे असा आरोप केला होता. घर सोडण्यापुर्वी लिहिलेल्या पत्रात जेरी डेव्हिड याचा उल्लेख केला होता. पैसा, सत्ता आणि पोलीस प्रशासन जेरी डेव्हिड यांचा खिशात असल्यामुळे मला न्याय मिळणार आहे की नाही हे मला माहित नाही, असे नारकर यांनी पत्रात म्हटले होते.
“माझ्या अंत्ययात्रेत येणाऱ्या सर्व मित्रांना विनंती आहे की, विभागातील गुंड प्रवृत्ती पळवून लावण्यासाठी शाखेतील नगरसेविकेचे कार्यालय आणि जिमचे सामान बाहेर काढून त्याचा टॅक्स शिवसेना पक्षाच्या नावे लावण्यात आल्यावरच माझ्या प्रेताचे अंत्यदर्शन व अंत्ययात्रा काढण्यात यावी,” असा उल्लेखही नारकर यांनी पत्रात केला होता.