ठाण्यातील वसंत विहार भागातील स्वामी विवेकानंदनगरमधील शिवसेनेचे शाखाप्रमुख मनोज नारकर हे सोमवार पहाटेपासून बेपत्ता झाले आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी जेरी डेव्हीड यांच्या धमक्या, मनमानी कारभार आणि पक्षविरोधी वागणुकीला कंटाळून जीवन प्रवास संपवत असल्याचे पत्र त्यांनी बेपत्ता होण्यापुर्वी लिहिलेले असून त्यांच्या या पत्रातील गंभीर आरोपांमुळे शहरात खळबळ उ़डाली आहे. हाच मुद्दा भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत उपस्थित करत शाखाप्रमुखाचा शोध घेण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्याची मागणी सभापतींकडे केली. भाजपाने हा मुद्दा उचलून धरल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान ठाणे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.

वसंत विहार भागातील स्वामी विवेकानंदनगरमधील शिवसेनेचे शाखाप्रमुख मनोज नारकर हे बेपत्ता झाल्याप्रकऱणी चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. नारकर यांनी त्यांचा मोबाइल घरीच ठेवला असून यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना शक्य झालेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि मित्रांच्या चौकशीतून पोलीस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्यांनी घर सोडण्यापुर्वी लिहिलेल्या पत्रात जेरी डेव्हिड यांच्यावर केलेल्या आरोपामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार डावखरे यांनी ठाणे शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला आहे.

ठाण्यातील शिवसेनेचे शाखाप्रमुख मनोज नारकर यांना शिवसेनेचे पदाधिकारी जेरी डेव्हिड याच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याचे मित्र आणि नातेवाईकांना त्रास दिला जात आहे. या प्रकाराला कंटाळून मनोज नारकर हे बेपत्ता झाले आहेत. त्यांनी घर सोडण्यापुर्वी लिहिलेल्या पत्रात जेरी डेव्हिड याचा उल्लेख केला आहे. पैसा, सत्ता आणि पोलीस प्रशासन जेरी डेव्हिड यांचा खिशात असल्यामुळे मला न्याय मिळणार आहे की नाही हे मला माहित नाही, असे नारकर यांनी पत्रात म्हटले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी केवळ व्यक्ती हरविल्याची तक्रार दाखल केली आहे, असे आमदार डावखरे यांनी म्हटले आहे. ठाण्यात शिवसेनेचेच मंत्री पालकमंत्री आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेचा एखादा शाखाप्रमुख असुरक्षित असेल, तर कायदा व सुव्यवस्था कुठे पोचली आहे, हे दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मनोज नारकर यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली. या संदर्भात शिवसेनेचे पदाधिकारी जेरी डेव्हीड यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या अंत्ययात्रेत येणाऱ्या सर्व मित्रांना विनंती आहे की, विभागातील गुंड प्रवृत्ती पळवून लावण्यासाठी शाखेतील नगरसेविकेचे कार्यालय आणि जिमचे सामान बाहेर काढून त्याचा टॅक्स शिवसेना पक्षाच्या नावे लावण्यात आल्यावरच माझ्या प्रेताचे अंत्यदर्शन व अंत्ययात्रा काढण्यात यावी,” असा उल्लेखही नारकर यांनी पत्रात केला आहे.