या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहाड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत अंबरनाथच्या फादर अँग्नल शाळेने सांघिक विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे या विजयी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठीही निवड करण्यात आली आहे. तलवारबाजी ऑलम्पिक स्पर्धेचे औचित्य साधून शहाड येथे जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्य़ातील विविध शाळांतील मुलांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेत अंबरनाथच्या फादर अँग्नल शाळेच्या तनीश शीरसाळे, देव गायकवाड, वेदांत सावंत, अक्षय ठाकर, शुभम बनसोडे या मुलांनी तर मेरी बिनलड. अश्वथी नायर, रूमन शेख, दिव्या परयानी, सिद्धीजा नायर, परमज्योत महादेवन, प्रज्ञा कुंभार आणि गितीका मानकानी या मुलींनी सांघिक विजेतेपद पटकावले. या सांघिक विजयाने या शाळेच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने त्यांच्यावर अंबरनाथकरांकडून कौतुकाचा वर्षांव होत आहे. संघाच्या या कामगिरीबद्दल संघाचे प्रशिक्षक राजेश शिंदे यांनीही समाधान व्यक्त केले असून राज्यस्तरीय स्पर्धेतही विजेतेपद पटकावण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

बॅडमिंटन शिबीर उत्साहात

कौस्तुभ विरकर बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीतर्फेघेण्यात येणारे बॅडमिंटन शिबीर नुकतेच पार पडले. या शिबिरात २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सेंट्रल रेल्वे इन्स्टिटय़ूट-कल्याण, ऑर्डनन्स फॅ क्टरी- अंबरनाथ, स्प्रिंग टाइम क्लब, गोदरेज हिल- कल्याण, डोंबिवली जिमखाना, कासाबेला पलावा, कासाबेला गोल्ड पलावा, कासा राहिओ पलावा, छेडानगर जिमखाना-घाटकोपर, र्मचट जिमखाना, इंडियन जिमखाना आदी विविध ठिकाणी या बॅडमिंटन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना ग्राऊंड ट्रेिनग सेशन, योग, मैदानावरील सराव, खाणे-पिणे याबाबतची माहिती देण्यात आली.

बॅडमिंटन स्पर्धेत ठाणेकरांना सुवर्ण

राज्यस्तरीय सबज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे अ‍ॅकॅडमीच्या रोहन थूल याने प्रत्येकी एक सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली आहे. मुलुंड येथील कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्य़ांमधून ७५० खेळाडूंनी भाग घेतला होता. या स्पर्धा १५ वर्षांखालील तसेच १३ वर्षांखालील मुले व मुलींच्या वयोगटामध्ये खेळविल्या गेल्या. ठाणे अ‍ॅकॅडमीच्या रोहन थूल याने उपांत्यपूर्व फेरीत एकेरीत २१-१८ व २१-१७ या गुणांनी अथर्व आटाव (पुणे) याचा पराभव केला. तसेच उपांत्य फेरीत त्याने तनिष्क सक्सेना (मुंबई) याचा २१-१३, २१-१६ असा पराभव केला. अंतिम फेरीत विजय दृष्टिक्षेपात दिसत असूनही व पहिला खेळ जिंकूनही नागपूरच्या सुधांशू भुरे या प्रतिस्पध्र्याविरुद्ध त्याला विजय मिळवता आला नाही. पहिली फेरी जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये त्याने १८-१४ अशी मोठी आघाडी घेतली होती. मात्र तिथून त्याची खेळावरची पकड सुटली आणि तो २०-२२ या गुणांनी हरला.

मुलांच्या दुहेरीमध्ये ठाणे अ‍ॅकॅडमीच्याच राहुल काणे याला साथीला घेऊन रोहन थूल याने दुहेरीचे अजिंक्यपद मिळवताना उपांत्य फेरीत अथर्व आरव व पार्थ धर्माधिकारी या पुण्याच्या जोडीचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. तसेच अंतिम फेरीत त्यांनी नागपूरचा सुधांशू भुरे व पुण्याचा पार्थ घुबे या जोडीचा सरळ डावात २१-१६, २१-१८ ने पराभव केला. रोहन थूल व राहुल काणे हे दोघेही ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी असून ते खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे नियमितपणे सराव करतात. त्यांच्या यशात प्रशिक्षक मयूर घाटणेकर, ईशान नक्की यांचा  मोठा वाटा आहे.

खेळाडूबरोबरच ठाण्यातील प्रशिक्षक ही ठरले अव्वल..

झारखंड (राँची) येथे झालेल्या ९ व्या सब ज्युनियर राष्ट्रीय चॉकबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मुलींच्या संघाने प्रथम स्थान पटकावत सुवर्णपदावर आपले नाव कोरले तर ठाण्यातील मुलांच्या संघाने तृतीय स्थान मिळविले. मुलांच्या संघात मुयर जरे या ठाण्याच्या खेळाडूचा समावेश होता. या संघांना चॉकबॉल खेळामध्ये मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक ठाणे जिल्ह्य़ातील आहेत.

या विजेत्या संघांना ठाण्यातील प्रशिक्षक सिद्धार्थ पाटील आणि मामा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी ठाणे चॉकबॉल संघटनेचे सचिव व  महाराष्ट्र चॉकबॉल संघटनेचे सहसचिव राहुल अकुल यांनी खेळाडू मयुर आणि प्रशिक्षकांचे कौतुक केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane sport event
First published on: 30-06-2016 at 02:26 IST