ठाणे : दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवारी रात्री झालेल्या दुर्घटनेचा परिणाम शनिवारी सकाळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला.   ठाणे आणि त्यापल्याड असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये सकाळपासून प्रवाशांची तुडुंब गर्दी उसळली होती. रेल्वे स्थानकात उपनगरीय गाडय़ांची वाहतूक अनिश्चित असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. फलाट आणि रेल्वे स्थानकांवरील पुलांवर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. फलाटांवर उभे राहण्यास जागा नसल्याने काही प्रवाशांना थेट रेल्वे रुळांवर उभे राहून रेल्वेगाडय़ांची वाट पाहावी लागली. लहान बालके आणि वृद्धांचे स्थानकांतील गर्दीमुळे प्रचंड हाल झाले. 

 ठाणे, डोंबिवली, कल्याण ते बदलापूर आणि कसारा रेल्वे स्थानकापर्यंत सर्वच रेल्वे स्थानकांत प्रवाशांची तुडुंब गर्दी उसळली होती. या गर्दीमुळे फलाट अपूर्ण पडू लागले होते. त्यामुळे काही प्रवाशांना रेल्वे रुळांवर उभे राहून रेल्वे गाडय़ांची वाट पाहावी लागली. बदलापूर, अंबरनाथ आणि त्या पल्ल्याड असलेल्या रेल्वे स्थानकांत रेल्वेगाडय़ा सुमारे दोन तास उपलब्ध नव्हत्या. तसेच रेल्वे स्थानकांमध्ये येणाऱ्या रेल्वे गाडय़ांमध्येही पाय ठेवण्यास जागा नव्हती.   पादचारी पुलांवर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. बदलापूर आणि अंबरनाथ येथील प्रवाशांनी कल्याण रेल्वे स्थानक गाठून कल्याणहून प्रवास केला.

या गर्दीमुळे सर्वाधिक हाल हे बालके, महिला प्रवासी आणि वृद्धांचे झाले.  जलद रेल्वेगाडय़ाही धिम्या रेल्वेमार्गिकेने वळविल्याने प्रवाशांना कल्याण ते ठाणे गाठण्यासाठी सुमारे एक तास लागला होता. ठाणे रेल्वे स्थानकातून कळवा येथे जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे महापालिकेने विशेष बससेवेचे नियोजन केले होते. तर काही प्रवाशांनी भर उन्हात रेल्वे रुळांवरून पायी रेल्वे स्थानक गाठल्याचे चित्र होते.

प्रवाशांची लूट

ठाण्याहून मुलुंड, भांडूप या स्थानकांत जाणाऱ्या प्रवाशांनी रिक्षाचा पर्याय निवडला होता. त्यामुळे रिक्षाचालकांनी मुलुंड आणि भांडूपपर्यंतच्या प्रवासासाठी तीनशे ते चारशे रुपये उकळण्यास सुरुवात केली होती.