Thane Dahi Handi 2025 Celebration ठाणे : शहरात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठाणे शहर हे गोविंदांची पंढरी म्हणून ओळखले जाते. या शहरात बड्या बड्या राजकीय नेत्यांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यातील एक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांची सोन्याची हंडी ही शहरातील मानाची हंडी असल्याचे मानले जाते. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दहीहंडीची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेली ही दहीहंडी मानाची असल्यामुळे अनेक गोविंदा पथक याठिकाणी पहिले सलामी द्यायला येतात. यंदाही सकाळ पासून ठाणे शहरातील तसेच मुंबई आणि उपनगरातील गोविंदा पथकांनी टेंभीनाक्याच्या या दहीहंडीला सलामी देण्यासाठी गर्दी केली होती. अनेक मंडळांनी या ठिकाणी थर रचत सलामी दिली. तसेच गाण्यांवर ताल धरला.

या दहीहंडीला सकाळपासून कलाकार मंडळी देखील येत आहेत. बॉलीवूड अभिनेता गोविंदा, अभिनेता शरद केळकर, संतोष जुवेकर असे विविध कलाकार या दहीहंडीला आले होते. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी या दहीहंडीला सर्वप्रथम हजेरी लावतात. दुपारी १ वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या दहीहंडील उपस्थिती लावली. शिंदे टेंभीनाक्याच्या या दहीहंडीला येताच डीजेवर ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’ असे गाणे वाजू लागले. हे गाण ऐकताच अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. तर, या गाण्याने राजकीय चर्चा देखील रंगू लागल्या होत्या.