ठाणे : जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील आठ गाव आणि पाझर तलावांमधून २९ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. या कामामुळे या गाव आणि तलावांमध्ये २९ हजार क्युबिक मीटर अधिक पाणी साठा निर्माण होणार आहे. याबरोबरच, येत्या काही महिन्यांत आणखी ३४ तलावांतील गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांच्या अतिदुर्गम भागात पाणी टंचाई आणि नापिकीचे संकट अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. या भागातील गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. परंतू, टँकरमधून होणारा पुरवठा देखील अपुरा पडतो. यंदाच्या वर्षी हवामान खात्याकडून पावसाचा चांगला अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी गाळ मुक्त धरणे आणि गाळयुक्त शिवार योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याअनुषंगाने, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील ५० गावांत तलाव आणि पाझर तलावांचे गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये यापूर्वी सहा तलावांमधून २१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. तर, आता शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील १० तलावांचे गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यापैकी ८ तलावांमधून २९ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आले आहे, आणि बाकीचे गाळ काढण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे या भागात विहिरी आणि बोअरवेल्सच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्यास मदत होणार आहे.
गाळ मुक्त धरण आणि शिवार योजनेचा फायदा
गाळ मुक्त धरणे आणि शिवार योजनेंतर्गत गाळ काढल्यामुळे पाणी जमिनीत साठून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल, ज्यामुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीला आणि सिंचन क्षेत्राला चांगला फायदा होणार आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना जलसंपत्तीचा अधिक उपयोग होईल. तसेच, हातपंप, कुंपणलिका आणि कपडे धुण्यासाठी देखील पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता दिलीप जोकर यांनी दिली.