ठाणे – १९६५ साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाला यंदा ६० वर्ष पुर्ण होत आहेत. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आक्रमणाचा पराभव करून थेट लाहोरपर्यंत धडक मारली होती. या ऐतिहासिक युद्धाबाबतचे विविध पैलू ठाण्यात उलगडले जाणार आहेत. यासाठी ठाण्यात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण सैनिकी संघर्ष मानले जाते. हे युद्ध ५ ऑगस्ट १९६५ रोजी पाकिस्तानने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ अंतर्गत काश्मीरमध्ये घुसखोरी करून सुरू केले. पाकिस्तानचा उद्देश काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करून ते ताब्यात घेण्याचा होता. मात्र, भारतीय सैन्याने या घुसखोरीला जोरदार प्रतिकार केला. युद्ध पुढे सीमाभागांमध्ये पसरले आणि भारताचे सैन्य थेट लाहोर आणि सियालकोटपर्यंत पोहोचले.
या युद्धात भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अत्यंत खंबीर आणि संयमित नेतृत्व असल्याचे दिसून येते. ‘जय जवान, जय किसान’ हा त्यांचा नारा देशात देशभक्तीची लाट घेऊन आला. भारतीय लष्कर, वायूदल आणि नौदलाने या युद्धात शौर्य गाजवत पाकिस्तानच्या मनसुब्यांना चोख प्रत्युत्तर दिले. २३ सप्टेंबर १९६५ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपामुळे या युद्धाला विराम जाहीर करण्यात आळा. पुढे १० जानेवारी १९६६ रोजी रशियाच्या मध्यस्थीने ‘ताश्कंद करार’ झाला, ज्यात दोन्ही देशांनी युद्धपूर्व सीमा पुन्हा स्वीकारल्या. या युद्धाला यंदा ६० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त ठण्यात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दीनदयाळ प्रेरणा केंद्राने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
नेमका कार्यक्रम काय ?
दीनदयाळ प्रेरणा केंद्राने ‘१९६५ भारत – पाकिस्तान युद्धाची साठ वर्ष आणि आजचा संदर्भ’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी भारतीय सैन्याचा पराक्रम, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची भूमिका, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे वेध व्याख्यानाच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. युद्धशास्त्र आणि इतिहासाचे अभ्यासक लेखक मल्हार गोखले हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पराडकर हे या व्याख्यानाचे अध्यक्ष असणार आहेत. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून या व्याख्यानाला ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते आणि कार्यवाह मकरंद मुळे यांनी केले आहे.
कार्यक्रम कधी आणि कुठे
हे व्याख्यान शनिवार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. मूस रोड वरील, शिवसमर्थ शाळेशेजारील श्रीराम व्यायाम शाळा सेवा संस्था तिसरा मजल्यावरील सभागृहात होणार आहे.