ठाणे – ठाणे ते पुणे (स्वारगेट) नियमितपणे शेकडो प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांमधून प्रवास करतात. मात्र, सध्या ठाण्यातून थेट पुण्याकडे जाण्यासाठी कोणतीही आरामदायी बसगाडी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना शिवशाही किंवा वातानुकूलित बसगाड्यांचा वापर करावा लागत आहे. या बसगाड्यांचे दर साध्या बसगाड्यांच्या तुलनेत दुप्पट आहेत. पुर्वी आरामदायी बसगाडीमधुन २०० ते २५० रुपये दराने प्रवास होणाऱ्या ठाणे-पुणे मार्गासाठी आता ५०० रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे एसटी विभागात आठ मुख्य आगार असुन येथून दररोज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या गाड्या जातात. ठाण्यातील वंदना तसेच खोपट आगारातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या आगारामधून सातारा, कोल्हापूर,पुणे, रत्नागिरी, जळगाव, अकोला, नाशिक या मार्गांवर बसगाड्या धावतात. तसेच मागील दोन वर्षाच्या कालावधीत ठाणे एसटी विभागाने ऑनलाईन पद्धतीने आरक्षण, समूह आरक्षण, एसटी तुमच्या दारात, सणोत्सवासाठी आगाऊ आरक्षण तसेच प्रवाशी संख्या जास्त असल्यास त्यांच्या मागणीनुसार थेट त्यांच्या निश्चित स्थळी गाडी नेणे यांसारख्या अनेक उपायोजना सातत्याने राबविल्या आहेत. यामुळे खासगी वाहतुकीच्या तुलनेत येथील प्रवास तिकीटाचे दर अत्यंत कमी असल्याने प्रवासी देखील या गाड्यांमधून प्रवास करण्यास पसंती देतात. मात्र ठाणे ते पुणे प्रवास करणारे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
पुर्वी ठाण्यातील वंदना तसेच खोपट आगारातून थेट स्वारगेटला जाण्यासाठी आरामदायी (एशियाड) बसगाड्या होत्या. परंतु मागील दोन वर्षापासून या बसगाड्यांचे आयुर्मान संपल्याने बंद करण्यात आलेल्या आहेत. या बसगाड्या अत्यंत स्वस्त व प्रवाशांना सोयीच्या होत्या. मात्र, आता आरामदायी (एशियाड) बसगाड्या नसल्याने प्रवाशांना शिवशाही किंवा वातानुकूलित (एसी) बसगाड्यांचा एकमेव पर्याय उरला आहे. परंतु त्याचे तिकीट दर जास्त असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. शिवशाहीसारख्या महागड्या बसगाडीचाच पर्याय राहिल्याने विद्यार्थ्यांपासून नोकरदार वर्गापर्यंत सर्वच त्रस्त झाले आहेत. ठाणे ते पुणे(स्वारगेट) प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
अखेर शिक्षकांचे वेतन मार्गी; प्रभारी शिक्षण अधिकाऱ्याच्या नियुक्तीने शिक्षकांना दिलासा
सध्या साताराला जाणाऱ्या साध्या बसगाड्या कात्रज बाह्यवळणाने जात असल्याने त्या स्वारगेटला थांबत नाहीत. परिणामी, स्वारगेटला पोहोचण्यासाठी काही प्रवासी सोलापूर मार्गावरील गाड्यांमधून प्रवास करत आहेत. थेट स्वारगेटला जाण्यासाठी साधी बसगाडी नसल्याने साधारण २०० ते २५० रुपये दराने प्रवास होणाऱ्या ठाणे-पुणे मार्गासाठी आता ५०० रुपये मोजावे लागत असल्याचे प्रवासी सांगत आहेत. शिवशाही तसेच ई -बसचे तिकीट हे ५०० रुपयांपर्यंत आहे. हा खर्च प्रवाशांना परवडत नसल्याने ठाणे ते पुणे जाण्यासाठी साधी बसगाडी उपलब्ध करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.
पूर्वी ठाण्यातील वंदना व खोपट आगारातून स्वारगेटला जाण्यासाठी आरामदायी( एशियाड) बसगाड्या होत्या. मात्र दोन वर्षापासून या बसगाड्या बंद करण्यात आल्या. या बसगाड्या बंद केल्यानंतर त्याबदल्यात दुसऱ्या कोणत्याही साध्या बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही असे प्रवाशांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
ठाणे ते पुणे हे कमी अंतर असल्याने स्वतंत्र साध्या बसगाड्या नाहीत. मात्र, या मार्गावर जाणाऱ्या अनेक साध्या बसगाड्या आहेत, त्या स्वारगेटला थांबतात. प्रवाशांनी लेखी मागणी केल्यास स्वतंत्र बसगाडी उपलब्ध करण्याचा विचार केला जाईल.- सागर पळसुले, विभाग नियंत्रक, ठाणे एसटी