ठाणे : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅन सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्याविरोधात नागरिकांना ठाणे वाहतुक शाखेच्या कार्यालयाबाहेर शनिवारी सायंकाळी निदर्शने केली. यात राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतल्याचे दिसून आले. यावेळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने तीन हात नाका भागातील मार्गांवर वाहतुक कोंडी झाली होती. यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला या कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

ठाणे शहरात पुरेसे वाहनतळ उपलब्ध नाहीत. यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात. शहरातील अनेक ठिकाणी अरूंद रस्ते आहेत. याठिकाणी वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे कोंडी होते. त्यामुळे वाहतूकीस अडथळा ठरत असलेल्या दुचाकींवर वाहतूक पोलिस टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करतात. या टोईंग वाहनाद्वारे वाहतुकीस अडथळा असलेल्या दुचाकी उचलून नेल्या जातात. तर, चारचाकी वाहनांवर पोलिस जॅमर लावण्याची कारवाई करतात. ते वाहन बाजूला केले जात नसल्याने कोंडी कायम राहते. यामुळे दुचाकी वाहनांवरच कारवाई होताना दिसून येते. या कार्यपद्धतीवर सतत टिका होत असून याबाबत नागरिकांक़डून तक्रारी केल्या जात होत्या. त्यातच टोईंग व्हॅनच्या कामाची मुदतही संपत आल्याने वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन बंद केली होती. मात्र, मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिक अजय जया यांनी विरोध दर्शविला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निर्णयाविरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा जया यांनी दिला होता आणि आठवडाभरापासून नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. दरम्यान, शनिवार सायंकाळी ठाणे वाहतुक शाखा कार्यालयाबाहेरील रस्त्यावर अजय जया यांनी वाहन उभे करत निदर्शने केली. सुमारे एक ते दीड तास आंदोलन सुरू होते. टोईंग व्हॅन बंद झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. या आंदोलनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.