ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहराला लागलेले वाहतूक कोंडीचे शुक्लकाष्ट अजूनही संपलेले नाही. शुक्रवारी सकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्गावर दोन वाहने बंद पडल्याने तसेच घोडबंदर मार्गावर मेट्रोची कामे सुरू असल्याने ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागला.
मुंब्रा बाह्य वळण मार्गावर नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर घोडबंदर मार्गावर मानपाडा पूल, कासारवडवली पर्यंत कोंडी झालेली आहे. ही कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ आले आहेत. सकाळी नऊ नंतर ही येथील वाहतूक कोंडी सुटली नव्हती त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.
घोडबंदर मार्गावरील मानपाडा आणि नागला बंदर येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणचे काम सुरू होते. हे काम पहाटे पाच वाजता संपले. परंतु वाहनांचा भार या मार्गावर वाढला होता. त्यामुळे कासारवडवली ते मानपाडा पुलापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वसई, बोरिवली, मीरा भाईंदर भागात जाणाऱ्या वाहन चालकांना कोंडीचा फटका सहन करावा लागला. घोडबंदर मार्गावर रस्त्याची अवस्था वाईट आहे. तसेच मेट्रो मार्गिका कामामुळे रस्ते देखील अरुंद झाले आहे. त्यात कोंडी यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मुंब्रा बाह्यवळण मार्गावरही उरण जेएनपीटीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकवर दोन अवजड वाहने बंद पडली. त्यामुळे मुंब्रा बाह्य वळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पण वाहतूक कोंडी झाल्याने ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चालकांना, नोकरदारांना प्रचंड हाल सहन करावे लागले आहेत. ठाणे शहरातील कोंडीचा त्रास केव्हा संपणार अशी विचारणा नागरिक करत आहेत.