शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा विषय झालेल्या ठाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत अखेर रवींद्र फाटक यांनी बाजी मारली आहे. रवींद्र फाटक यांनी मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच निर्णायक आघाडी घेत वसंत डावखरे यांचे सर्व दावे सपशेल फोल ठरवले. या लढतीत फाटक यांचे पारडे जड असल्याचे मानले जात होते. परंतु, अखेरच्या क्षणी राजकीय चमत्कार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले डावखरे यावेळीदेखील आपला करिश्मा दाखवणार का, याची अनेकांना उत्सुकता होती. मात्र, रवींद्र फाटक यांनी महायुतीच्या पाठिंब्यावर सुरूवातीपासूनच मतमोजणीत वरचष्मा राखला . या अटीतटीच्या लढतीत काँग्रेस- राष्ट्रवादीची मते फुटल्याने शिवसेनेची ताकद माझ्या कामी येईल असा दावा करणाऱ्या डावखरेंचा डाव त्यांच्यावरच उलटला. या निवडणुकीत एकुण १०५७ मतदारांनी मतदान केले होते, त्यापैकी सहा मते ही बाद ठरली. उर्वरित मतांपैकी रवींद्र फाटक यांना ६०१ तर डावखरे यांना ४५० अशी मते मिळाली. शिवसेना-भाजपला त्यांच्या संख्याबळापेक्षा ९० मते अधिक मिळाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर डावखरे मतमोजणी कक्षातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, मी विजयी उमेदवार रवींद्र फाटक यांचे अभिनंदन करतो, असे सांगत आपला पराभव मान्य केला. वसंत डावखरे यापूर्वी ठाण्यातून सलग तीनवेळा विधानपरिषदेवर निवडून गेले होते. मात्र, यंदा सत्तेची गणिते बदलल्याने डावखरेंना पराभव पत्कारावा लागला. दरम्यान, या विजयानंतर ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरूवात केली आहे.
वसईच्या ठाकुरांचा शिवसेनेला ठेंगा!
गेल्या काही दिवसांत दोन्ही बाजुंकडून आवश्यक ते संख्याबळ जमवण्यासाठी प्रचंड मोर्चेबांधणी करण्यात आली होती. शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. तर वसंत डावखरे यांना काँग्रेससह हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही पाठिंबा दिला होता. याशिवाय, ७२ अपक्षांची मते या निवडणुकीत निर्णायक मानली जात होती.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2016 रोजी प्रकाशित
Thane vidhan parishad election result: ठाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत रवींद्र फाटक विजयी
दोन्ही बाजुंकडून आवश्यक ते संख्याबळ जमवण्यासाठी प्रचंड मोर्चेबांधणी करण्यात आली होती.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 06-06-2016 at 08:53 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane vidhan parishad election result