ठाणे – माजिवडा येथील पेट्रोल पंपाजवळील एका निर्माणधीन इमारतीमध्ये रंगकामासाठी एक कामगार खुल्या उदवाहकातून जात होता. पण, वीज पुरवठा गेल्याने तो इमारतीच्या २१ मजल्यावर अडकला. वीज पुरवठा सुरळीत होईल, या आशेवर असलेल्या त्याच्या वरिष्ठांनी रात्री उशिरापर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर महावितरणशी संपर्क साधला पण, कर्मचारी संपावर गेल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांला बसला. अखेर ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाने महावितरणच्या पथकाला आणले आणि १५ तासांनी त्याची सुटका झाली.

माजिवडा भागातील पेट्रोल पंपाजवळ आशार प्लस ही ३५ मजली निर्माणधीन इमारत आहे. या इमारतीमध्ये कामगारांसाठी खुले उद्वाहक उभारण्यात आले आहे. आलो हुसेन(३९) हे रंगकाम करतात. ते बुधवारी दुपारी ३ वाजता इमारतीत रंगकाम करण्यासाठी जात होते. उदवाहक २१ व्या मजल्यावर आली आणि त्याचवेळी वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे आलो हुसेन हा २१ व्या मजल्यावर उदवाहकात अडकला. उदवाहक चारही बाजूने खुले असल्यामुळे कामगार फारसा त्रास झाला नाही. त्याचे सहकाऱ्यांनी हा प्रकार पाहून त्याला धीर देण्यास सुरुवात केली. तर, त्याचे वरीष्ठही तिथे आले.

थोड्यावेळात वीज येईल, या आशेवर सर्वजण होते. पण, रात्रीचे ११ वाजले तरी वीज पुरवठा सुरू झाला नाही. हुसेनला उदवाहकात बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर वीज पुरवठा सुरू होत नसल्यामुळे वरिष्ठांनी महावितरणशी संपर्क साधला. पण, कर्मचाऱ्यांचा संप असल्याचे त्यांना कळले. रात्री दोन वाजेपर्यंत वाट पाहुनही कोणीच कर्मचारी येत नसल्याचे लक्षात येताच वरिष्ठांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती दिली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख यासीन तडवी यांनी महावितरणचे अधिकारी राठोड यांना या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राठोड यांनी तात्काळ एक पथक त्या ठिकाणी पाठवले. त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि कर्मचारी, कापूरबावडी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान महावितरण कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तडवी यांनी ठाणे शहरात असलेली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथकाही घटनास्थळी पाचारण केले होते. तसेच तडवी यांनी आयशर कॅन्स्ट्रॅक्शन चे साईड इंजिनियर यांनाही बोलावून तात्काळ जनरेटर उपलब्ध करून देण्यास सांगितले. अर्ध्या तासात त्यांनी जनरेटर आणला आणि त्यानंतर हुसेनची पहाटे ६ वाजताच्या सुमारास १५ तासाच्या अथक प्रयत्नानंतर जनरेटरच्या सहाय्याने विद्युत पुरवठा सुरळीत करून सुटका करण्यात आली. त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.