ठाणे : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरू आहे. मात्र, हि प्रक्रीया सदोष असल्यामुळे त्याचा फटका अनेक दुर्धर आजारी, दिव्यांग तसेच इतर शिक्षकांना बसल्याचे समोर आले आहे. अनेक शाळांमध्ये मंजुर पदांपेक्षा जास्त शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या असून यामुळे या जास्त नेमणुकांमुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरल्याने ते पुन्हा बदलीस पात्र ठरत आहेत. या सर्व प्रकारामुळे शिक्षकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्याचे कंत्राट ‘’विन्सी’ या खाजगी सॉफ्टवेअर कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळांमध्ये मंजूर पदसंख्या विचारात घेऊन शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये मंजूर पदापेक्षा अधिक शिक्षक बदली प्रक्रियेने पाठवले गेले असल्याचे समोर आले आहे. १८ जून २०२४ च्या शासन निर्णय नुसार बदली प्रक्रियेसाठी सात टप्पे निश्चित करण्यात आले असून शिक्षकांची संवर्ग एक ते संवर्ग चार मध्ये विभागणी केली आहे.
संवर्ग एक मधील २५३ शिक्षकांच्या नुकत्याच बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे ठाणे जिल्ह्यात अनेक शाळांवरील कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अशाच पद्धतीने बदली प्रक्रिया राबविली गेल्यास अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची संख्या शेकडोमध्ये जाण्याची भीती शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे. परिणामी अवघ्या दीड-दोन महिन्यातच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना बदली प्रक्रियेस सामोरे जावे लागणार असल्याने शिक्षकांमधून बदली प्रक्रियेवर संताप व्यक्त होत आहे.
चुकीच्या प्रक्रियेने आमची ससेहोलपट
संवर्ग- एक मध्ये अनेक दुर्धर आजारी, दिव्यांग,५३ वर्षावरील शिक्षकांचा समावेश होतो. शासन निर्णयाने या संवर्गातील शिक्षकांना सोयीची शाळा निवडण्याचा किंवा बदलीस नकार देण्याचा अधिकार दिला आहे. परंतु हे शिक्षक अतिरिक्त ठरल्याने त्यांना बदली प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शासन निर्णयाने अधिकार दिला असला तरी चुकीच्या प्रक्रियेमुळे आमची ससेहोलपट होणार असल्याची भावना या संवर्गातील अनेक शिक्षकांनी व्यक्त केली.
बदलीच्या सावटाखाली
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण होण्यास ऑगस्ट, सप्टेंबर महिना उजाडणार आहे. चुकीच्या बदली प्रक्रियेमुळे शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने लगेच अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या करून समायोजन करण्यासाठी पुन्हा बदली प्रक्रिया राबवावी लागेल. त्यामुळे वर्षभर शिक्षक बदलीच्या सावटाखाली राहून त्याचा शिक्षकांच्या अध्यापन कार्यक्षमतेवर परिणाम होणार आहे.
‘विन्सी’ कंपनी बदली पोर्टलवर संच मान्यतेनुसार शाळांमध्ये मंजूर पदांची यादी जाहीर करते. मात्र प्रक्रिया राबविताना याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. शासन निर्णयाप्रमाणे बदलीस पात्र नसताना सुद्धा चुकीच्या प्रक्रियेमुळे शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने हा शिक्षकांवर अन्याय आहे. यात सुधारणा झाली नाहीतर शिक्षक समितीच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागितली जाईल. – विनोद लुटे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती ठाणे.