पनवेल : पनवेल महापालिकेमध्ये बालकांचे लसीकरण आणि गर्भवती महिलांची तपासणी वेळोवेळी सुरू असते. अशाच तपासणी मोहिमेमुळे मोठा गुन्हा उजेडात आला आहे. बाल वयात झालेल्या विवाहामुळे एक बालिका 14 आठवड्यांपासून गरोदर असल्याचे आरोग्य सेविकेच्या ध्यानात आले. कर्तव्यदक्षता दाखवत या आरोग्य सेविकेने पोलिसांत तक्रार नोंदविली.

संबंधित कर्तव्यदक्ष आरोग्य सेविका कळंबोली वसाहतीमधील पालिकेच्या आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. याबाबत पीडित बालिकेच्या पालकांसह तिचा पती आणि त्याच्या पालकांविरोधात कळंबोली पोलिसांत गुन्हा नोंदविला असून, पती राहत असलेल्या अहमदनगर येथील पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा – विश्लेषण: क्लस्टर सक्तीचा जाच कुणाच्या पथ्यावर? अधिकृत इमारतीतील रहिवाशांनाच नाहक मनस्ताप होतोय का?

कळंबोली येथील एल.आज.जी. या बैठ्या वस्तीमधील सप्तश्रुंगी मंदिरात पालिकेच्या आरोग्य विभागाची बालकांसाठी लसीकरण मोहीम आणि गर्भवती महिलांची तपासणी सुरू होती. या दरम्यान एक मुलगी गर्भवती असल्याने तेथे तपासणीसाठी आली होती. पालिकेच्या आरोग्य पथकातील कर्मऱ्यांनी पीडित मुलीकडून तिचे आधारकार्ड मागीतले. आधारकार्डावरील जन्म तारखेवरून मुलीचे वय 17 वर्षे 11 महिने असल्याचे समोर आले.

आरोग्य पथकाने खात्री करण्यासाठी पीडित मुलीचा शाळेचा दाखलाही पडताळून पाहिला. त्यामध्येही साम्य असल्याने संबंधित पीडितेच्या वयाची माहिती असतानाही पाथर्डी येथे तिच्या पालकांनी आणि सासरकरांनी तिचा विवाह सोहळा केला, तसेच ही पीडिता सध्या 14 आठवड्यांची गरोदर राहिल्याने पोलीस ठाण्यात पालिकेच्या आरोग्य सेविकेने रितसर कायदेशीर तक्रार नोंदविली.

हेही वाचा – ठाणे जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी तीन जणांची नियुक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडितेचा पती हा पाथर्डी येथील प्राप्तीकर विभागाच्या वसाहतीमध्ये राहतो. या प्रकरणाचा अधिक तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण हे करीत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यासह बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत पती व इतरांवर गुन्हा नोंदविला आहे.