येत्या सहा महिन्यांत ठाण्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसू नये यासाठी खड्डेमुक्त ठाण्याचा संकल्प सोडतानाच शहर सुशोभीकरण, साफसफाई आणि स्वच्छ स्वच्छतागृहांसाठी कालबद्ध अशा कार्यक्रमांची आखणी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी अभियानाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिकेमार्फत शनिवारी करण्यात आली. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ असे नामकरण या अभियानाचे करण्यात आले आहे.मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणामार्फत मेट्रो, उड्डाणपूल, खाडीकिनारा मार्गासारख्या मोठय़ा प्रकल्पांची अंमलबजावणी शहरात सुरू असताना ठाणे महापालिका पुढील सहा महिन्यांत शहरातील सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन प्रश्नांची उकल शोधण्यासाठी युद्धपातळीवर अभियान राबवेल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी केली. हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे असा आमचा प्रयत्न असेल, असा दावाही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात आले होते. नवी मुंबई महापालिकेत विविध आघाडय़ांवर लक्षवेधी कामगिरी करणारे अभिजीत बांगर यांची दोन महिन्यांपुर्वीच ठाणे महापालिकेत आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. बांगर यांच्या पुढाकाराने आखण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या नव्या संकल्पनेचा शुभारंभ करत असताना शिंदे यांनी शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन या वेळी दिले.

अभियानाचे स्वरूप
ठाणे महापालिकेमार्फत येत्या सहा महिन्यांचा कालावधीत हे अभियान आखण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त असतील असा संकल्प आहे. या माध्यमातून १०.७० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे कॅाक्रीटीकरण, ५५.६८ चौरस किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे यू.टी.डब्लू.टी तंत्रज्ञानावर आधारित कॅाक्रीटीकरण, ७५.४४ चौरस किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. याशिवाय स्वच्छतागृहे २४ तास स्वच्छ राहातील, अशी व्यवस्था उभारली जाणार आहे. रस्त्यांचे सुशोभीकरण, भित्तीचित्रे, पादचारी पुल, उड्डाणपुलांची रंगरंगोटी करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे.

जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो तरी ठाण्यात घरी आल्यानंतरच मला सुखाने झोप लागते, अशी ठाणे शहराविषयी आपुलकीची भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.मी धडाडीचा माणूस असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. देवेंद्र फडणवीस यांची मला साथ मिळत आहे. नागरिकांच्या हिताचे आम्ही धाडसी निर्णय घेत आहोत, असे शिंदे म्हणाले. मोठे उद्योग एक-दोन महिन्यांत जातात का, सध्या आमच्यावर आरोप करण्याची स्पर्धा लागली आहे, कारण मी काम करतो आहे. आरोपांना कामाने उत्तर देणार असल्याचे शिंदे म्हणाले.

आव्हाड अनुपस्थित; मात्र ट्वीटने चर्चा
ठाणे : माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गेल्या महिन्यात दोन दिवसांच्या अंतराने दाखल झालेले दोन गुन्हे, त्यांना झालेली अटक, त्यावरून त्यांच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये निर्माण झालेली कटुता राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. ठाण्यातील राजकीय परिघात वर्षांनुवर्षे पाहायला मिळालेला सर्वपक्षीय सुसंवाद या घटनांमुळे संपत आहे का अशी चर्चाही यानिमित्ताने ऐकायला मिळाली. हा घटनाक्रम ताजा असताना शनिवारी ठाणे महापालिकेच्या एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केलेले ट्वीट चर्चेत आले. या ट्वीटच्या अखेरीस आव्हाड यांनी शेक्सपिअर यांच्या ज्युलीअस सीझर यांच्यावरील प्रसिद्ध नाटकातील ‘यू टू ब्रुटस’ या संवादाचा केलेल्या उल्लेखाचेही अनेक अर्थ या वेळी काढले जात होते.

ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने शनिवारी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी ठाण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आमंत्रण होते. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यास अर्धा तास आधी आव्हाड यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले. या ट्वीटमध्ये त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित न राहण्यामागे उपहासात्मक पद्धतीने कारण दिले. ‘आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहेत. महापालिकेने मला या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे. परंतु ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर असताना माझ्यावर ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल झाला. ते स्वत: साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील’ असे ट्वीट त्यांनी केले.
यू टू ब्रुटस.. शेक्सपिअर यांच्या गाजलेल्या ज्युलीअस सीझर नाटकात प्रमुख व्यक्तिरेखा असलेल्या रोमन सम्राट ज्युलीअस सीझर या पात्राच्या तोंडी हे वाक्य आहे. ब्रुटस हा ज्युलीअस सीझरचा घनिष्ठ मित्र असतो. मात्र, सीझरच्या हत्येचा कट रचून मारेकरी जेव्हा त्याला भोसकतात तेव्हा ब्रुटसही हातातील सुरा सीझरच्या आरपार करतो. जेव्हा आपल्या मित्रानेच आपल्याला भोसकले हे सीझरच्या लक्षात येते तेव्हा त्या व्यक्तिरेखेच्या तोंडी ‘ यू टू ब्रुटस’ हे वाक्य नाटकात आहे. मित्रानेच घात केला अशा आशयाच्या या वाक्याचे ट्वीट आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्ंया ट्वीटमध्ये केल्याने ते चर्चेत राहिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The chief minister changing thane campaign was launched in the presence of shinde amy
First published on: 04-12-2022 at 05:54 IST