“गांधी-नेहरूंच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी नवा लढा उभारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत आम्ही असा भारत घडवू, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ठाण्यात मशाल रॅलीदरम्यान व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. स्वातंत्र्य चळवळीत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी जीवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. लाठ्या-काठ्या, तुरुंगवास आणि प्रसंगी गोळ्याही झेलल्या. हुतात्म्यांच्या या समर्पणातूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात सोमवारी मशाल रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ते तलावपाळी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानपर्यंत “मशाल रॅली” काढण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रॅलीमध्ये ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, ठाणे -पालघर विभागिय महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड यांच्यासह सुमारे पाचशेपेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाचपाखाडी, आग्रा रोड, राममारूती रोड, साईकृपा हॉटेल, तलावपाळी असा प्रवास करीत ही रॅली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विसर्जित करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून जय हिंद, वंदेमातरम, भारतमाता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, हजारो-लाखो लोकांच्या बलिदानातून आपणाला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. हे स्वातंत्र्य कायम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करायचा असेल तर आपणाला जातीपातील मतभेद दूर करावे लागतील. तरूणांना अभिप्रेत असलेला भारत घडविण्यासाठी आपणाला लढा उभारावा लागेल.