साडेनऊ कोटींच्या प्रस्तावाला पालिकेची मान्यता; लवकरच पुनर्बाधणी करणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सद्यस्थितीत उभ्या असलेल्या फूल बाजाराची दुरवस्था झाल्याने या ठिकाणी नव्या बाजाराची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने यासाठी पुढाकार घेतला आहे. या विषयीचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नुकताच मंजूर करण्यात आला. यासाठी ९.५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून लवकरच या बाजाराच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती फूल बाजार समितीचे सभापती बजरंग हुलवळे यांनी सांगितले.

कल्याण येथील फूल बाजारातून ठाणे तसेच आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर फुलांची निर्यात होत असते. दिवसेंदिवस ही मागणी वाढू लागल्याने या ठिकाणी फुलांची घाऊक खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. या बाजाराची पुनर्बाधणी करण्याची तयारी कृषी उत्पन्न बाजार समितीने दाखवली होती. यासंबंधी कल्याण महापालिकेने बांधकाम परवानगी देण्याची आवश्यकता असल्याने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. या प्रस्तावास महापालिकेने मंजुरी दिली असून आता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या बाजाराची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. त्यानुसार या भूखंडावर एकमजली किंवा दुमजली अशी सुसज्ज मंडईची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे ९.५० कोटी इतका खर्च येऊ शकतो.

याविषयीचे आराखडे व नकाशे तयार करण्यात येणार असल्याचे,फूल बाजार समितीचे सभापती बजरंग हुलवळे यांनी सांगितले.

सध्याच्या फुलबाजाराची दुरवस्था

कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना विस्थापित करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कल्याण डोंबिवली महापालिकेला १९९५ साली तीन हजार ८२५ चौमीचा भूखंड देण्यात आला होता. या भूखंडावर ५९३ गाळे असून त्यापैकी १९५ गाळ्यांचा ताबा बाजार समितीकडे आहे. पालिकेने एक एकर जागा स्वतकडे ठेवली आहे. समितीच्या आवारात असलेल्या या जागेवर सध्या फूल बाजार भरविला जातो. या जागेवर पालिकेचे नियंत्रण असून पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने येथे प्रचंड घाण, अव्यवस्थापन पहायला मिळते. याबरोबरच फूल बाजाराच्या शेडचे पत्रे आणि लोखंडी खांबही मोडकळीस आले असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार मोडकळीस आल्याने व्यापारी, शेतकरी, ग्राहक यांची गैरसोय होत होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The new flower market approved in kalyan
First published on: 31-08-2016 at 01:20 IST