कल्याण : कल्याण शिळफाटा रस्त्यावर कल्याण तळोजा मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. या कामांसाठी लावण्यात आलेल्या संरक्षित पत्रे भिंतीमुळे शिळफाटा रस्ता अरूंद झाला आहे. या रस्त्यावर त्यामुळे सतत वाहन कोंडी होते. हे माहिती असुनही अनेक वाहन चालक कोंडी झाली की उलट मार्गिकेतून वाहने चालवितात. अशा उलट मार्गिकेतून वाहने चालविणाऱ्या इतर वाहनांना अडथळे निर्माण करणाऱ्या, त्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या ९२ वाहन चालक, मालकांवर कोळसेवाडी वाहतूक विभागाने मंगळवारी रात्री दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केले.

कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या निर्देशावरून ही कारवाई केली. शिळफाटा रस्त्यावर मागील दोन वर्षापासून मेट्रो मार्गाची कामे सुरू झाल्यापासून सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. मेट्रोच्या कामांंमुळे मार्गिका आक्रसल्या गेल्या आहेत. मंगळवारी रात्री कल्याण शिळफाटा रस्त्यावर मानपाडा चौकातून काटईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सांडभोर आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर यांना मानपाडा चौक ते काटई नाका मार्गिका कोंडीने गजबजली असल्याने काही वाहन चालक काटईकडून मानपाडा चौकाकडे येणाऱ्या मार्गिकेत उलट दिशेने वाहने चालवून काटई दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले. एका वाहन चालकाच्या मागे अनेक वाहने एकावेळी उलट मार्गिकेत घुसल्याने वाहतूक पोलिसांची ती वाहने रोखताना दमछाक झाली. ही वाहने पुन्हा माघारी पाठवली तर वाहतूक कोंडीत आणखी भर पडेल असा विचार करून मानपाडा चौक, रुग्णवाल गार्डनकडून काटई चौकाकडे उलट मार्गिकेतून जाणाऱ्या वाहनांचे वाहन क्रमांक वरिष्ठ निरीक्षक सांडभोर आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हरवाळकर यांनी मोबाईलमध्ये दंडात्मक कारवाईसाठी कैद करण्यास सुरूवात केली. मंगळवारी रात्री नऊ ते रात्री १२ वाजेपर्यंत ९२ वाहनांचे वाहन क्रमांक पोलिसांनी मोबाईलमध्ये कैद केले.

या सर्व वाहन चालक, मालकांवर ऑनलाईन माध्यमातून दंडात्मक कारवाईची प्रक्रिया करून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याने फौजदारी गुन्ह्याची कारवाई केली. या उलट मार्गिकेतून येणाऱ्या वाहन चालकांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची, अपघात घडल्यास आतील चालक, प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. या ९२ वाहन चालकांच्या दुसऱ्या वाहनांना, प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्यासारखी कृती केल्याने साहाय्यक पोलीस उनिरीक्षक हरवाळकर यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी ९२ वाहन चालक, मालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिळफाटा रस्त्यावरून प्रवास करताना यापुढे कोणीही वाहन चालकाने उलट मार्गिकेतून वाहन चालविले तर त्यांच्यावर फौजदारी गु्न्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. एखादा वाहन चालक सतत अशी कृती करत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याचा वाहन परवाना आरटीओच्या माध्यमातून निलंबनाचा विचार केला जाणार आहे.- सचिन सांडभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कोळसेवाडी वाहतूक विभाग.