ठाणे : पावसाळय़ापूर्वी महामुंबई खड्डेमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्राधिकरणांना दिले होते. त्यानंतर या सर्वच प्राधिकरणांनी मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्याचा फटका आता  बसू लागला असून या भागात वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली आहे. महामुंबईत दुपारी अवजड वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात सुरू असते. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. यामुळे अध्र्या तासाच्या अंतरासाठी सुमारे सव्वा तास लागतो.  नोकरदरांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचणे शक्य होत नाही. त्यातच उन्हाच्या तीव्र झळा असल्याने वाहनचालक मेटाकुटीला येतात.

ठाणे शहरातून मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग जातात.  या रस्त्यांवर पावसाळय़ात दरवर्षी खड्डे पडतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर ठाणेकरांना कोंडीचा सामना करावा लागतो. येत्या पावसाळय़ातील ही  समस्या टाळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळय़ापूर्वी महामुंबईतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश विविध प्राधिकरणांना दिले होते. त्यामुळे सुमारे महिन्याभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जात आहे. त्यासाठी मुंब्रा बाह्यवळण मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून उरण जेएनपीटी येथून गुजरात, भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असते.

हेही वाचा >>> राज्य सरकारला धक्का, मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका फेटाळली

बाह्यवळण मार्ग बंद झाल्याने या अवजड वाहनांना शिळफाटा येथे प्रवेशबंदी असून ही वाहने पटणी, ऐरोली टोलनाका, पूर्व द्रुतगती महामार्ग येथून वाहतूक करत आहेत. दुपारच्या वेळेत या अवजड वाहनांचा भार या मार्गावर वाढू लागला आहे. तर, साकेत, खारेगाव खाडी पुलाचेही काम दोन दिवसांपासून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. एकूण चार पदरी पूल असून टप्प्याटप्प्याने या मार्गाची दुरुस्ती केली जात आहे. या दोन्ही कामांमुळे  शहरातील ठाणे-बेलापूर मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, भिवंडी येथील मानकोली, कशेळी-काल्हेर मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढून कोंडी होऊ लागली आहे.  अध्र्या तासाच्या अंतरासाठी वाहनचालकांना सव्वा तास लागत आहे.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालकांकडून नाराजी

ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ठाण्यातील कापूरबावडी उड्डाणपुलाखाली मार्ग, माजिवडा नाका, कॅसलमिल, वागळे इस्टेट, कळवा चौक, पोलीस मुख्यालय परिसर तसेच घोडबंदर भागातील काही रस्ते दुरुस्तीसाठी खोदण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.