मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेतीबंदर येथील उन्नत रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाडीतून सतीश तावडे (३४) हा तोल जाऊन मुंब्रा खाडीत पडला. सतीश हा शु्क्रवारी दुपारी आईसोबत मुंबईतील रुग्णालयात जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळेस ही घटना उघडकीस आली. मुंब्रा पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्याचा शोध सुरू आहे. परंतु त्याचा शोध अद्यापही लागू शकलेला नाही.
दिवा येथील रेल्वे स्थानक परिसरातील त्रिमुर्ती इमारतीमध्ये सतीश हा त्याच्या आईसोबत राहतो. शुक्रवारी दुपारी तो आई सोबत मुंबईतील राजावाडी रुग्णालयात निघाला होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास रेल्वेगाडीतून प्रवास करत असताना सतीश हा रेल्वेगाडीच्या दरवाजामध्ये उभा होता. रेल्वेगाडी नव्याने बांधलेल्या रेतीबंदर येथील मुंब्रा खाडीवरील उन्नत रेल्वे मार्गावरून जात असताना सतीशचा रेल्वेगाडीतून तोल गेला आणि तो खाडीत पडला.
या घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाल्यानंतर मुंब्रा पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पथकाने त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु त्याचा शोध लागला नाही. त्यानंतर खाडीला भरती आल्याने पथकाने शोधकार्य थांबविले होते. शनिवारी मुंब्रा पोलीस आणि अग्निशमन दलाने पुन्हा शोधकार्य हाती घेतले. परंतु दुपारी १२ नंतरही त्याचा शोध लागू शकला नव्हता.