किशोर कोकणे
गाडी पेट्रोल भरण्यासाठी थांबल्याच्या निमित्ताने शेजारच्या इमारतीत ‘सहज’ घुसलेल्या चोरटय़ांनी भरदुपारी एका बंद घरात शिरून ३४ तोळे सोने लुटून नेले. कोणतीही पूर्वयोजना नसताना हाती घबाड आल्याने हे चोरटे भलतेच खूश होते. पण ज्याच्या घरी त्यांनी चोरी केली, तो पोलीस होता! अवघ्या काही दिवसांतच चोरटय़ांच्या हाती बेडय़ा पडल्या.
ठाण्यातील खोपट भागात एक पोलीस कर्मचारी त्यांच्या पत्नीसोबत राहतात. दोघेही नोकरी करत असल्याने २३ ऑक्टोबरला ते दोघेही सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडले. सायंकाळी या पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी घरी पोहचल्यानंतर त्यांच्या घराचा लॅच त्यांना तुटलेला दिसला. घरात प्रवेश करताच कपाटातील वस्तू इतरत्र पडलेल्या होत्या. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घरातील सोने तपासले असता सुमारे ३४ तोळे सोने गायब झाले होते. यानंतर दांपत्याने तात्काळ नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसाच्या घरातच चोरी झाल्याने या घटनेची उकल करण्याचे मोठे आव्हान आता नौपाडा पोलिसांसमोर होते. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, उपायुक्त सुभाष बुरसे, साहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले. यात पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, अशोक भंडारे, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, पोलीस हवालदार सुनील अहिरे, महेश भोसले, पोलीस नाईक प्रशांत निकुंभ, संजय चव्हाण, हरिष तावडे, साहेबराव पाटील, सनील राठोड, गोविंद पाटील, भागवत थविल, विकास चडचणकर, पोलीस शिपाई गोरखनाथ राठोड यांचा सामावेश होता.
सुरुवातीला पथकाने या भागातील रस्त्यावरील आणि पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या कॅमेऱ्यांमध्ये पेट्रोल पंपावर आलेल्या एका कारमधून दोन जण उतरल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर ही कार एका बारजवळ आली. या कारमधील इतर दोघेही बारमध्ये शिरले. काही वेळाने उर्वरित दोघेही बारमध्ये आले. त्यानंतर दोन ते अडीच तासाने हे चौघेही बारमधून बाहेर पडताना पोलिसांना दिसले. यातील एकाचे छायाचित्र स्पष्ट दिसत होते. त्यामुळे हे छायाचित्र पोलिसांनी मुंबई, ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबई पोलिसांना पाठविले. त्यावेळी हा बाबू खान (३५) असून त्याला काही वर्षांपूर्वी एका चोरीच्या गुन्ह्य़ामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांकडून मिळाली. पथकाने तात्काळ ठाणे ग्रामीण पोलिसांकडून नोंदवहीतील त्याच्या नातेवाईकांचा मोबाइल क्रमांक मागविला. सुदैवाने हा मोबाइल क्रमांक सुरूच होता. पोलिसांनी या मोबाइल क्रमांकाचे सीडीआर मागविले. तसेच त्याचे लोकेशन ट्रेस केले. त्यावेळी हा मोबाइल गोवा भागात असल्याचे दिसत होते. या मोबाइल क्रमांकावरून सतत तीन व्यक्तींशी बोलणे सुरू असल्याची माहिती सीडीआरमध्ये पोलिसांना मिळाली. त्यामुळे हा मोबाइल क्रमांक बाबूच वापरत असावा असा अंदाज आल्याने पोलिसांनी या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला नाही. ७ नोव्हेंबरला पोलिसांनी तात्काळ गोवा गाठले. गोव्यातील एका उडपी हॉटेलमध्ये बाबू बसल्याचे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. त्यासोबत या प्रकरणातील दुसरा आरोपी संजय कांबळे ऊर्फ सलीम कुबडय़ा (४०) हा देखील त्याच्यासोबत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. या दोघांना नौपाडा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली. त्या दुपारी कारमध्ये इंधन भरताना संजय आणि बाबूला अचानक सुचले की एखाद्या इमारतीत फेरफटका मारून यावा. ते परिसरातील इमारतीमध्ये शिरले असता, एक घर बंद असल्याचे त्यांना दिसले. मात्र, त्यासमोरील घराचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे हे चौघे बारमध्ये गेले. बारमध्ये काही काळ थांबल्यानंतर पुन्हा चौघे बाहेर पडले. तोपर्यंत पोलिसाच्या घरासमोरील घर बंद झाले होते. त्यानंतर त्यांनी पोलिसाचे घर फोडल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, पोलिसांना त्यांच्याकडून दागिने हाती लागले नाहीत. हे दागिने तिसरा साथीदार विजयानंद इंगळे (३५) याच्याकडे होते. त्याला पोलिसांनी ८ नोव्हेंबरला चेंबूर येथून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून २८ तोळे सोने जप्त केले. तर, चौथा आरोपी हा १७ वर्षीय आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
