ठाणे : शिळफाटा येथे इंधन माफियांकडून भूमिगत वाहिनीला छिद्र पाडून त्याद्वारे कच्च्या तेलाची चोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी शिळफाटा भागात भूमिगत विद्युत वाहिन्यांना आग लागल्याची घटना उघडकीस आली होती. अग्निशमन दलाकडून प्रयत्न करूनही आग विजविली जात नव्हती. याच भागातून कच्च्या तेलाची वाहिनीही जाते. त्यामुळे भारत पेट्रोलियमच्या (बीपीसीएल) अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, कच्चे तेल वाहून नेणाऱ्या वाहिनीमध्ये छिद्र पाडून त्याद्वारे तेलाची चोरी होत असल्याचे समोर आले.

याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काही महिन्यांपूर्वी याच भागात कच्च्या तेलाच्या चोरीचा प्रयत्न उघडकीस आला होता. त्यामुळे या कच्च्या तेलाच्या चोरीमागे माफियांची टोळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा – अंबरनाथ : ठाकरे समर्थकांकडूनच उद्धव, आदित्य ठाकरेंचे छायाचित्र शाखेबाहेर; उरलेले उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारीही शिवसेनेत

शिळफाटा येथील शिळ-दिवा भागात शुक्रवारी टोरंट कंपनीच्या रोहित्राचा स्फोट होऊन भूमिगत विद्युत वाहिन्यांनीही पेट घेतला होता. या घटनेत एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला. अग्निशमन दलाने येथील गटारांची झाकणे उघडून आग विजविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही काही क्षणात आगीचा भडका वाढत होता. सुमारे १८ तासानंतर अग्निशमन दलाला येथील आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. परंतु, धुर सुरूच होता. या भागातून बीपीसीएल कंपनीची कच्चे तेल मुंबई ते मनमाडला वाहून नेणारी भूमिगत वाहिनीही गेली आहे. त्यामुळे वाहिनीमध्ये कुठे गळती सुरू आहे का, याचा तपास बीपीसीएलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सुरू होता. या भागात कर्मचाऱ्यांनी खोदकाम केले असता, दोन ठिकाणी वाहिनीला गळती लागल्याचे स्पष्ट झाले होते. शिळ-डायघर पोलिसांनी या भागाची पाहणी केली असता, त्या ठिकाणी कच्च्या तेलाची चोरी करण्यात येत असावी, असा संशय आला. त्यानुसार, सोमवारी याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

डिसेंबर २०२२ मध्येही शिळफाटापासून काही अंतरावर अशाचप्रकारे या वाहिनीतून कच्चे तेल चोरण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठी सहा फूट खड्डाही खणण्यात आला होता. परंतु तेल चोरीचा हा प्रयत्न शक्य झाला नव्हता. याप्रकरणी नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेसाठी ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून पेट्रोल, डिझेल तयार केले जाते. या इंधन माफियांकडून या कच्च्या तेलाचा नेमका कशासाठी उपयोग केला जात असावा, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.