ठाणे : महापालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याचे चित्र असतानाच, शहरालगतच्या डोंगर भागात असलेल्या येऊरसह घोडबंदरमधील आदिवासी पाड्यांवरही पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर श्रमजिवी संघटनेच्या शिष्टमंडळाची ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासोबत नुकतीच एक बैठक पार पडली. त्यात आदिवासी पाड्यांवरील टंचाईची समस्या दूर करण्यासाठी कुपनलिकांची संख्या वाढविणे, जलवाहिन्या टाकणे आणि पाणी साठवणुकीसाठी टाक्या बसविणे अशा उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचा सविस्तर आराखडा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येत होता. शहराचे गेल्या काही वर्षांत झपाट्याने नागरिककरण झाले आहे. वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत हा पाणी पुरवठा अपुरा पडत होता. अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर वाढीव पाणी देण्याची मागणी पालिकेने राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार राज्य शासनाने पालिकेला भातसा धरणातून वाढीव पाणी दिले आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेनेही शहराला वाढीव पाणी मंजुर केले. यामुळे शहरात आता दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत आहे. असे असले तरी जलवाहीन्या दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने आणि त्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागांत टंचाईची समस्या निर्माण होते. त्यापाठोपाठ आता शहरालगतच्या डोंगर भागात असलेल्या येऊरसह घोडबंदरमधील आदिवासी पाड्यांवरही पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे. या पाड्यांवर पुरेसा पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी श्रमजिवी संघटनेच्या शिष्टमंडळाने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी आदिवासी पाड्यांवरील टंचाईची समस्या दूर करण्यासाठी कुपनलिकांची संख्या वाढविणे, जलवाहिन्या टाकणे आणि पाणी साठवणुकीसाठी टाक्या बसविणे अशा उपाययोजना करण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा आराखडा तयार करण्याचे आदेश बांगर यांनी पाणी पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सविस्तर आराखडा तयार केला आहे.
हेही वाचा – ठाणे: ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या रोशनी यांना अंतरिम जामीन मंजूर
काय आहे आराखडा
येऊर आणि घोडबंदर येथील डोंगर भागात आदिवासी पाडे आहेत. त्यातील बोरूडेपाडा, अवचितपाडा,धर्माचापाडा, ब्रह्मांड, कशेळीपाडा, पाचवडपाडा, पानखंडा, बामणाली पाडा, टकारडा आणि येऊर भागातील देवाचा पाडा याठिकाणी पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. याठिकाणी जुन्या कुपनलिका आणि विहिरीद्वरे पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी महापालिकेच्या जलवाहीनीतून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु याद्वारे पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे येथील पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी कुपनलिका संख्या वाढविणे, जलवाहिन्या टाकणे, पंप बसविणे आणि पाणी साठवणुकीसाठी टाक्या बसविणे अशी कामे करण्यात येणार असून वनविभागाची परवानगी घेऊन ही कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.