शहापूर : मुंबई नाशिक महामार्गावरील चेरपोली गावच्या भागात १२ हजार रुपयाचे मोबाईल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. तर त्याचा साथिदार जखमी झाला आहे. चोरट्यांची आठ जणांची टोळी असून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तर इतर चारजण फरार झाले आहेत. सर्व आरोपी उल्हासनगरमधील रहिवासी असल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले.
मुंबई-नाशिक महामार्गावरुन प्रवास करणारा टेम्पो चालकाने कामानिमित्ताने त्याचे वाहन थांबविले. तो पुन्हा वाहनामध्ये चढत असताना चार दुचाकीवर आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने दमदाटी, मारहाण करून त्याचा मोबाईल खेचून नेला. त्यानंतर टोळक्यांनी नाशिक दिशेने दोन किमी अंतरावर जाऊन चेरपोली हद्दीत राजकिरण हॉटेल समोर आणखी एका ट्रक चालकाला अडवून त्याचा मोबाईल व ट्रकची चावी खेचली. त्याचवेळी एक भरधाव वाहनाने त्यांच्या एक दुचाकीला धडक दिली. यात गौतम फुलवाणी हा चोरटा जागीच ठार झाला असून निखिल अडनानी जखमी झाला आहे.
याप्रकरणी टेम्पो चालक मनोजकुमार यादव याने शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून फरार झालेले निल शिशपाल सिंग, विशाल पवार, काळू, हृदय उर्फ बब्बू मूलचंदाणी या चौघांचा शहापूर पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, या अपघात प्रकरणी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले.