डोंबिवलीत चोरी करताना चोरट्याचा आठव्या माळयावरून पडून मृत्यू

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून बांधलेल्या घरांमधील खिडक्यांचे दरवाजे, विद्युत साहित्य, पाण्याचे नळ चोर नियमित चोरून नेतात

डोंबिवली जवळील खंबाळपाडा येथे कल्याण डोंबिवली पालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विद्युत सामानाची चोरी करण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांपैकी एका तरूणाचा इमारतीच्या वाहिनीवरून उतरताना पाय घसरून मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी दिली.

मोहम्मद भाटकर असे मयत तरूणाचे नाव आहे. अरफाह पिंजारी असे त्याच्या जखमी साथीदाराचे नाव आहे. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी चोरी आणि अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

पोलिसांनी सांगितले, पालिकेने शहरी गरीबांसाठी खंबाळपाडा येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून घरे बांधली आहेत. झोपु प्रकल्प वाद्ग्रस्त आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या घरांचे पालिकेने वाटप केलेले नाही. या घरांमधील खिडक्यांचे दरवाजे, विद्युत साहित्य, पाण्याचे नळ चोर नियमित चोरून नेतात. चोर, भंगार विक्रेत्यांचे झोपु योजनेतील घरे उपजीविकेचे साधन झाले आहे.

सोमवारी मध्यरात्री मोहम्मद आणि अरफाह हे झोपु योजनेतील घरांमद्ये विद्युत साहित्य चोरी करण्यासाठी गेले. चोरी करत असताना आवाज झाल्याने येथील रखवालदाराला घरांमध्ये चोर घुसल्याचे लक्षात आल्याने रखवालदाराने विजेरीचा झोत चोरांच्या दिशेने मारला. आपण पकडले जाऊ या भीतीने मोहम्मद, अरफाह घाईने इमारतीच्या मल वाहू वाहिनीवरून उतरू लागले. मोहम्मदचा वाहिनीवरून पाय सटकल्याने तो आठव्या माळ्यावरून जमिनीवर पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पाठोपाठ अरफाह पडला. तो जखमी झाला.

रखवालदाराच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हे दाखल करून घेतले आहेत, असे साहाय्यक पोलीस आयुक्त मोरे यांनी सांगितले.

मोहम्मद हा सराईत गु्न्हेगार होता. त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल होते. अरफाहवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो ठीक झाल्यावर त्याला अटक करून त्याची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thief falls from eighth floor while stealing in dombivali asj

Next Story
नालेसफाईची कामे ७० टक्के पूर्ण ; उर्वरित कामे आठ दिवसांत पूर्ण होणार असल्याचा ठाणे महापालिका आयुक्तांचा दावा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी