डोंबिवली : आतापर्यंत दुकान, हाॅटेल, घरात चोरटे चोऱ्या करत होते. पण, कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील आडिवली ढोकळी भागात एका हाॅटेलच्या बाहेरील स्टीलचा स्नॅ्क्सचा काऊंटर चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेला आहे. आडिवली, गोळवली भागात अधिक प्रमाणात भंगार विक्रेते आहेत. त्यांंनीच ही चोरी केली असण्याचा संशय परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या चोरी प्रकरणी कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी भागातील साई सिध्दी नगर भागात राहणारे हाॅटेल मालक विजय आनंदा गवळी यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी अज्ञाता विरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार विजय गवळी यांचा दावडी रिजन्सी रस्त्यावर हाॅटेल आणि हमदर्द कुल्लड चहा नावाने दुकान आहे. याठिकाणी ते दररोज सकाळपासून ते रात्री दहा वाजपर्यंत चहा बरोबर वडापाव, समोसा आणि इतर खाद्यपदार्थ विकतात. ग्राहकांना सुस्थितीतपणे हाॅटेल बाहेर उभे राहता यावे म्हणून त्यांनी स्टीलच्या सांगाड्याचा काऊंटर तयार केला होता. स्टेनलेस स्टीलचा हा काऊंटर असल्याने ग्राहकांना या मंचाच्या माध्यमातून खाद्य पदार्थ देणे, तो स्वच्छ ठेवणे हाॅटेल व्यावसायिकाला परवडत होते. हा स्टीलचा काऊंटर हाॅटेल बाहेरील जागेत होता. दावडी रिजन्सी रस्ता सतत वर्दळीचा असल्याने हा काऊंटर कोणी चोरून नेणार नाही असे हाॅटेल मालक गवळी यांना वाटत होते.
परंतु, पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी बुधवार, गुरूवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास हाॅटेलच्या बाहेर येऊन, रस्त्यावर वर्दळ नाही पाहून चोरून नेला. पाच बाय पाच आकाराचा आणि तेवढ्याच उंचीचा हा काऊंटर होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हाॅटेलचे कर्मचारी हाॅटेल हाॅटेल उघडण्यासाठी आले. तेव्हा त्यांना हाॅटेल बाहेरील मोकळ्या जागेत स्टीलचा काऊंटर दिसून आला नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला, पण तो कोठेच आढळला नाही. ही माहिती तात्काळ कामगारांनी हाॅटेल मालक विजय गवळी यांना दिली. ते हाॅटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला. चौकशी केली पण कोठेही स्टील काऊंटर आढळला नाही. चोरट्यांनी पाळत ठेऊन तो चोरून नेला असावा असा संशय व्यक्त करत विजय गवळी यांनी याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा काऊंटर सहज उचलून नेण्यासारखा नव्हता. त्यामुळे चोरट्यांनी टेम्पो आणून तो चोरून नेला असण्याचा हाॅटेल चालकाला संशय आहे. साहाय्यक उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. या चोरीमुळे इतर हाॅटेल मालकांमध्ये आपले दररोज बाहेर असलेले स्टीलचे काऊंटर चोरीला जातात की काय याची भीती वाटू लागली आहे.
