ठाणे : येऊर परिसरातील मामा-भांजे दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हेरी हिल येथील भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्याची मागणी भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे करूनही त्याकडे वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक यांना लेखी निवदेन देऊन अनधिकृत धर्मस्थळापेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची असल्याने हे अतिक्रमण तत्काळ हटविण्याची मागणी केली आहे. तसेच अतिक्रमण हटविण्यात आले नाही तर दर्ग्याशेजारीच शंकराचे मंदिर उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी वनविभागाला दिला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला येऊर वनक्षेत्र परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. या येऊर वनक्षेत्रात मामा-भांजे दर्गा आहे. या दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आले आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी मनविसेकडे केल्या आहेत. याच परिसरात भारतीय वायुसेनेचे तळ आहे. या परिसरात झाडे लावण्यासदेखील मनाई असतानाही येथे बिनदिक्कतपणे अशाप्रकारे अतिक्रमण सुरू आहे. वायुसेनेच्या या तळाच्या परिसरात असलेल्या मामा-भांजे दर्ग्यालगत काही अनोळखी लोक स्थलांतरित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षिततेलादेखील धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले असून त्यात येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्याची मागणी केली. परंतु ढिम्म प्रशासनाने रमजान सण असल्याचे निमित्त सांगून कारवाईत चालढकल सुरू केली, असा आरोप मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केला आहे.

व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा – ठाण्यात गेल्यावर्षी झालेल्या नालेसफाईच्या कामात घोटाळा? घोटाळ्याची चौकशी करण्याची मनसेची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निसर्गरम्य येऊरचे जंगल म्हणजे ठाणे शहराचे वैभव आहे. मुंबई आणि ठाणे शहराच्या मधोमध असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या दक्षिणेकडे उंच डोंगर माथ्यावर मामा-भांजे दर्गा आहे. या डोंगरावर समाधी घेतलेल्या हजरत सय्यद बहाउद्दीन आणि हजरत सय्यद बद्रुद्दीन या सुफी पंथांच्या मामा-भाच्यांचे दर्गे असल्याची वदंता आहे. मात्र ते केव्हा आणि कसे आले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याठिकाणी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने त्या परिसरात अनधिकृत बांधकामे करण्यात आली असून त्यामुळे एअरफोर्सच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे, असे पाचंगे यांनी म्हटले आहे. अतिक्रमण हटविण्यात आले नाहीतर दर्ग्याशेजारीच शंकराचे मंदिर उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी वनविभागाला दिला आहे.