डोंबिवली येथील मानपाडा भागातील आयसीआयसीआय बँकेत कार्यरत कर्मचाऱ्याने बँकेतील अंतर्गत व्यवहारात हेराफेरी करून पाच दिवसापूर्वी बँकेतून १२ कोटी २० लाख रुपयांची रक्कम साथीदारांच्या साहाय्याने नियमबाह्य वळती करून चोरी केली होती. बँकेने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास करून तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून पाच कोटी ८० लाख रुपयांची रोख, १० लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.
इसरार अबरार हुसेन कुरेशी (३३), शमशाद अहमद रियाज अहमद खान (३३), अनुज प्रेमशंकर गिरी (३०) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मानपाडा पोलीस, मालमत्ता कक्ष समांतर या प्रकरणाचा तपास करत होते.
बँक चोरी प्रकरणातील एक आरोपी मुंब्रा येथील मित्तल मैदाना जवळ येणार आहे अशी माहिती ठाण्याच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. ठरल्या वेळेत इसरार कुरेशी तेथे येताच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीमधून पोलिसांनी अनुज, शमशाद यांना अटक केली. बँक ग्राहकांच्या खात्यामध्ये, भरण्यासाठी आलेल्या धनादेशांमध्ये हेराफेरी, खाडाखोड बँक कर्मचाऱ्याच्या साहाय्याने या तीन जणांनी चोरी केली होती.
मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक अनिल होनराव, साहाय्यक निरीक्षक जगदीश मुलगीर, महेश जाधव, उपनिरीक्षक स्वप्निल प्रधान, दत्तात्रय कटकधोंड, हवालदार अर्जुन करळे, रुपवंतराव शिंदे, राजेंद्र घोलप, जयकर जाधव, आशा गोळे व इतर यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.