शहापूर : शहापूर येथील वाफेगाव परिसरात बुधवारी भातसा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि तिच्या मुलाचा सामावेश आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
लक्ष्मी दत्तात्रय पाटील (५०) त्यांचा मुलगा धीरज दत्तात्रय पाटील (१६) आणि लक्ष्मी यांची भाची मनिता सुदर्शन शेळके (३३) अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चेरपोली येथील लक्ष्मी आणि त्यांचा मुलगा धीरज तसेच वाफे गावात राहणाऱ्या लक्ष्मी यांच्या भाची मनिता हे तिघे भातसा नदीत अंघोळीसाठी गेले होते. नदी किनारी असलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले. परिसरातील रहिवाशांनी ही घटना पाहिली. त्यानंतर येथील मच्छीमारांनी त्यांना नदीतून बाहेर काढले. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार नेमका कसा घडला याचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही वर्षात वाफे हद्दीतील भातसा नदी पत्रात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या असून याठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे गोठेघर ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश कामडी यासह स्थानिक ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.
१० वीत शिकणाऱ्या धीरजचा मृत्यू
धीरज हा इयत्ता १० वीमध्ये शिकत होता. नुकतीच त्याने १० वीची परिक्षा दिली होती. तर त्याचे वडील दत्तात्रय हे रिक्षा चालक आहेत. धीरज, त्याची आई लक्ष्मी, लहान बहीण आणि वडिलांसोबत राहतो होता. धीरज याच्या घरची परिस्थितीती हालाकीची आहे. तसेच मनिता यांचे पती देखील रिक्षा चालक आहेत. मनिता यांनाही चार आणि पाच वर्षांची दोन मुले आहेत. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात नद्यांमध्ये बुडून मृत्यूचे प्रमाण वाढले
जिल्ह्यात नद्यांमध्ये बुडून मृत्यूचे प्रकार वारंवार घडत आहेत. धुळवडीच्या दिवशीही अशाचप्रकारे उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा मुंबईतील दोन मुलांचा उल्हासनदीत बुडून मृत्यू झाला होता. आता भातसा नदीत देखील असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही भातसा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.