ठाणे : दिवावासियांची कचराभुमीच्या समस्येतून सुटका करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहराबाहेर म्हणजेच भांडार्ली गावात शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून या प्रकल्पाचे परिचालन व देखभाल करण्यासंबंधीच्या निविदेस ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. या निविदेला नऊ वेळा मुदतवाढ देऊ केली असून यामुळे पालिकेला या कामासाठी ठेकेदार मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे दिवा कचराभुमी अद्यापही बंद होऊ शकलेली नसल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार ५० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी १२५ टन कचऱ्यावर विविध प्रकल्पांतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती केली जाते. उर्वरित सुमारे ६०० टन ओला कचरा दिवा कचराभूमीवर टाकला जात होता. या कचराभूमीत आग लागण्याचे प्रकार घडत असून यामुळे परिसरात सर्वत्र धुर पसरत आहे. तसेच कचराभुमीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यातूनची ही कचराभूमी हटविण्याची मागणी होत होती. तसेच महापालिका निवडणुकीत आठपेक्षा अधिक प्रभाग असलेल्या दिवा परिसरातील कचराभूमीचा मुद्दा सत्ताधारी शिवसेनेसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता लक्षात व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने दिवा कचराभूमी बंद करण्यासाठी पावले उचलली होती. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरती कचराभूमी उभारण्यासाठी पालिकेने जागा भाड्याने घेतली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी काही स्थानिकांनी सुरुवातीला विरोध केला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीनंतर स्थानिकांचा विरोध मावळला होता. त्यानंतर पालिकेने याठिकाणी कचरा विल्हेवाट यंत्रणा उभारणीबरोबरच रस्ता, शेड तसेच इतर आवश्यक कामे हाती घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून ही कामे सुरु आहेत. या प्रकल्पात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार असून हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर दिवा कचराभूमी बंद होणार आहे. डायघर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाचे काम पुर्ण होऊन तो कार्यान्वित झाल्यानंतर भांडार्ली येथील तात्पुरती कचराभुमी बंद करण्यात येणार आहे, असे पालिकेने यापुर्वीच स्पष्ट केले आहे. भांडार्ली येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाचे परिचालन आणि देखभालीसाठी निविदा काढण्यात आली आहे. आठ वेळा मुदतवाढ देऊनही ठेकेदारांचा प्रतिसाद मिळालेला नसून त्यामुळे निविदेला पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे. यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले तर पालिकेमार्फतच हा प्रकल्प चालविण्याबाबत विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रीया पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर दिली.

भंडार्ली येथे कचरा विल्हेवाटीसाठी महापालिकेने सुमारे १० एकर इतकी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. या जागेसाठी ५ रुपये ५० पैसे या दराने म्हणजेच महिन्याला २० लाख रुपये इतके भाडे जागा मालकांना देत आहे. या प्रकल्पात ओल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. तर, सुका कचरा वेगळा करून तो पुनर्वापरासाठी दिला जाणार आहे. हा प्रकल्प उभारणीचे काम पुर्ण झाले असून त्याठिकाणी चाचणीही काही दिवसांपुर्वी करण्यात आली आहे. हा प्रकल्प ठेकेदारामार्फत चालविण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने निविदा काढली होती. आठ वेळा मुदत वाढ देऊनही ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पालिकेने नववी मुदतवाढ देऊ केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc not get contractor for the bhandarli waste disposal project zws
First published on: 29-06-2022 at 16:17 IST