पिण्याच्या पाण्याच्या गैरवापरावर ठाणे महापालिकेचा उतारा
ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी रोडावू लागल्याने खडबडून जागे झालेल्या महापालिकेने शहरातील बडी संकुले तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उद्यानांना प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या कोपरी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात दररोज १५० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे पाणी खाडीत सोडून दिले जाते. या पाण्याचा वापर शहरातील उद्यानांसाठी करण्याची योजना असून मोठय़ा संकुलांना ते मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ठाणे, नवी मुंबई यासारख्या महापालिकांना सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी काही शे कोटी रुपये खर्च करून प्रक्रिया केंद्रे उभारण्यात आली आहेत. ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांमधील सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी थेट खाडीत सोडले जाते. त्यामुळे ठाणे खाडीचा अक्षरश नाला झाल्याने पर्यावरण प्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यावर उपाय म्हणून कोटय़वधी रुपये खर्च करून शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे या दोन्ही शहरांमध्ये उभारण्यात आली आहेत. प्रक्रियायुक्त पाणी कंपन्यांना तसेच खासगी आस्थापनांना विकण्याची घोषणा मध्यंतरी ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात आली होती. या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचा नफा कमविण्याचे बेतही आखण्यात आले आहेत. मात्र त्यात पुढे काही झाले नाही.
मे महिन्याच्या मध्यावर ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठय़ात आणखी कपात होण्याचे संकेत मिळू लागताच खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाला कोपरी केंद्रातील प्रक्रियायुक्त सांडपाण्याची आठवण आली आहे. पोखरण रस्ता क्रमांक एकच्या रुंदीकरणात कापण्यात आलेल्या झाडांच्या पुनरेपणासाठी संबंधित ठेकेदारास कोपरी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाणी वापरण्याच्या सूचना महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने दिल्या आहेत. हा प्रयोग काही अंशी यशस्वी झाल्याने शहरातील सर्व गृहसंकुलांना उद्यानासाठी लागणारे पाणी याच केंद्रातून मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ठाणे शहरात घोडबंदर मार्गावर मोठी गृहसंकुले उभी आहेत. लोढा, रुस्तमजी, हिरानंदानी, कल्पतरू अशा मोठय़ा विकासकांनी उभारलेल्या विशेष नागरी प्रकल्पांमध्ये विस्तीर्ण उद्यानांची उभारणी करण्यात आली आहे. या गृहसंकुलांमध्ये काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात आली असली, तरी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असल्यास कोपरी येथून उचलण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय शहरातील सार्वजनिक उद्याने, हरितपथाच्या सुशोभीकरणासाठी प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा वापर केला जावा, असे बंधन टाकण्याचे ठरविण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने यासंबंधीचे आवाहन जाहीरपणे केले जात नसले, तरी उद्यान विभागाला आणि संबंधित वसाहतींना पत्र पाठवून तशा सूचना देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.