ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने दीड वर्षांनंतर पुन्हा तिकीट दरवाढीच्या आखलेल्या प्रस्तावास नुकताच परिवहन उपक्रमाच्या विशेष समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. असे असताना यासंबंधीच्या अंतिम मंजुरीचा प्रस्ताव येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला असून त्यावर सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
या प्रस्तावानुसार ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसच्या तिकीट दरात दोन रुपयांनी, तर वातानुकूलित बसच्या दरात पाच रुपयांनी वाढ होणार आहे. महिन्याकाठी होणारा सुमारे दोन कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी हा प्रस्ताव आखण्यात आला आहे. दीड वर्षांपूर्वीच परिवहन उपक्रमाने तिकीट दरात भाडेवाढ लागू केली होती. असे असतानाच आता पुन्हा परिवहन उपक्रमाने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणित बिघडले
ठाणे परिवहनला प्रवासी भाडय़ापोटी रोज २७ लाख, तर महिन्याकाठी आठ कोटी दहा लाखांचे उत्पन्न मिळते. कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधनावर होणारा खर्च आणि देखभाल व दुरुस्तीवर सुमारे दहा कोटी खर्च होतो. यामुळे जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने परिवहन उपक्रमाने महिन्याकाठी होणारी सुमारे दोन कोटी रुपयांची तूट भरून काढावी लागणार आहे.