ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीनंतर परिवहन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेतला. या वृत्तास कंत्राटी कामगारांचे नेतृत्त्व करणारे समीर भोसले यांनी दुजोरा दिला आहे. ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) माध्यमातून महापालिका ठाणेकरांना अंतर्गत सार्वजनिक वाहतूकीची सुविधा उपलब्ध करून देते. परिवहन सेवेच्या सुमारे तीनशे बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी दररोज उपलब्ध होतात.

परंतु शहरातील प्रवाशांच्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी आहे. त्यातच कंत्राटी वाहकांनी शुक्रवारपासून पुकारलेल्या संपामुळे जेमतेम दोनशे बसगाड्या प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ऐन गणेशोत्सवापूर्वी हा संप सुरू झाल्याने खरेदीसाठी तसेच कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना वेळेत बसगाड्या उपलब्ध होत नाहीत. रोख आणि ठरविलेले वेतन मिळावे, थकबाकी मिळावी, रजा वेतन मिळावी अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवारी पहाटेपासून टीएमटी वाहकांनी संप पुकारला होता. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली.

हेही वाचा >>> “भाजपा आमदार गायकवाड यांची नार्को नव्हे, तर…” शिंदे समर्थक महेश गायकवाड यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीला माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे आणि परिवहनचे अधिकारी उपस्थित होते. अभिजीत बांगर यांनी संप मागे घेण्याची विनंती केली. दिवाळी बोनस, रजा वेतन बाबतीत महापालिका विचार करणार असल्याचेही स्पष्ट केले. ही बैठक सकारात्मक झाल्याने कर्मचारी संप मागे घेतील अशी शक्यता सुत्रांकडून वर्तविली जात होती. दरम्यान, शिष्टमंडळाने कर्मचाऱ्यांशी संवाद साधून बैठकीत झालेली चर्चा सांगितली आणि या बैठकीत बऱ्याच मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.