ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा, कोपरी आणि उथळसर भागातील घंटागाडी ठेकेदाराचा ठेका संपल्यामुळे तिथे चार महिन्यांपासून डम्परच्या साहाय्याने कचरा उचलला जात आहे. यासाठी डम्परच्या एका फेरीमागे अधिकाऱ्याला २०० रुपये मिळत असल्याचा गौप्यस्फोट नगरसेविका महेश्वरी तरे यांनी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत केला. याशिवाय, कचरा उचलण्याचे काम दिलेल्या ठेकेदारांचे दर वेगवेगळे असून त्यात सुमारे ८०० रुपयांची तफावत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. या प्रकरणी सविस्तर चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
जून २०१४ मध्ये नौपाडा, कोपरी आणि उथळसर भागातील घंटागाडी ठेकेदारांचा ठेका संपुष्टात आला. त्यामुळे त्यांच्या जागी नवे ठेकेदार नेमण्यात आले. त्यांना ९० दिवसांच्या आत घंटागाडी पुरवण्याची अट घातली होती. मात्र त्याने त्याचे पालन केले नाही. त्यासाठी तीन महिन्यांची आणखी मुदत मागितली. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या भागातील कचरा उचलण्यासाठी दोन ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली. त्यापैकी एका ठेकेदाराला तीन हजार, तर दुसऱ्या ठेकेदाराला २२०० रुपये असे दर लावण्यात आले आहेत, अशी माहिती देत या दोघांच्या दरामध्ये आठशे रुपयांची तफावत का आहे, असा सवाल तरे यांनी उपस्थित केला.
या ठेकेदारांकडील डम्परच्या प्रत्येक फेरीमागे पालिका अधिकाऱ्यांना २०० रुपये मिळत असल्याचा गौप्यस्फोट करीत या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. घंटागाडी ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्यानंतर त्या जागी नवीन ठेकेदार नेमणे अपेक्षित होते. मात्र तसे करण्यात आलेले नाही. तसेच कचरा उचलण्याचे काम दिलेल्या ठेकेदारांनी घंटागाडीवर काम करणाऱ्या कामगारांना सेवेत घेतले नाही. यामुळे घंटागाडीवर काम करणाऱ्या १२० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे, अशी माहितीही
त्यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणी येत्या मंगळवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन त्यामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापौर संजय मोरे यांनी दिली.