उद्योगमंत्री उपस्थित राहणार; पुनर्वसनाचा प्रश्न कायम
ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच धरणाच्या सांडव्याची उंची वाढविण्याचे काम ६५ मीटपर्यंत पूर्ण झाले आहे. २००९ ते २०१५ या काळात उंची वाढवण्याच्या कामाला प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्याने ते रखडले आहे. याविषयी विचार करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई बुधवारी कल्याणात येत असून यानिमित्ताने एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. धरणाची उंची वाढविण्याच्या कामात अडथळे येत असल्याने ते दूर करण्यासंबंधी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे इस्टेट, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, टीटीसी, तळोजा अंबरनाथ, बदलापूर या औद्योगिक क्षेत्रांत तसेच विविध स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी १९७२ साली बारवी धरण बांधण्यात आले. त्या वेळी त्याची पाणी साठवण क्षमता १२२.५८ दक्षलक्ष लिटर इतकी होती. दुसऱ्या टप्प्यात १७८.५८ पर्यंत वाढविण्यात आली. पाण्याची वाढती मागणी व गरज लक्षात घेता धरणाची पाणी साठवण क्षमता ३४०.४८ दक्षलक्ष घनमीटर इतकी वाढविण्यात येणार आहे. यासंबंधीचे काम औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेतले आहे. मात्र २००८ पर्यंत तिसऱ्या टप्प्यातील केवळ भिंतीचे (नॉनओव्हर फ्लो विभागाचे) काम झाले आहे.
विस्थापितांना समाधानकारक नुकसानभरपाई देऊनही ते स्थलांतरित होत नसल्याने या ग्रामस्थांना कसे विस्थापित करायचे, हा प्रश्न मंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर आहे. आजच्या या बैठकीला लोकप्रतिनिधी, संघर्ष समितीचे पदाधिकारी, विस्थापित नागरिक, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काही ना काही तोडगा नक्की निघेल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत.

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न
या कामातील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप कायम आहे. तोंडली, मोहघर व संलग्न पाडे, काचकोली व संलग्न पाडे, कोळेवडखळ, सुकाळवाडी व मानिवली अशा सहा गावांची वस्ती सुमारे ७३७ इतकी आहे. केवळ मोहघर १ व २ची कामे जवळजवळ अंतिम टप्प्यात असून विस्थापितांच्या घरांचे काम सुरू आहे. तोंडली वगळता इतर गावठाणाची पुनर्वसनाची कामे पूर्णत्वास येऊनदेखील येथील ग्रामस्थ स्थलांतरित झालेले नाहीत.