टोईंग व्हॅन नसल्याने केवळ दुचाकींवरच कारवाई ; चारचाकी वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
अंबरनाथच्या वाहतूक विभागाकडे चारचाकी मोठी वाहने उचलण्यासाठी टोईंग वाहनच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून, केवळ दुचाकी उचलण्यासाठीचेच टोईंग वाहन या विभागाकडे आहे. त्यामुळे रस्त्यावर मुख्य अडथळा ठरणाऱ्या चारचाकी वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने चार चाकी वाहनांचे चालक बिनदिक्कतपणे गाडय़ा मिळेल त्या ठिकाणी उभ्या करत आहेत. मात्र त्यामुळे वाहतूक विभागाकडून फक्त दुचाकींवर कारवाई होत असल्याने दुचाकीचालकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे.
अंबरनाथ व बदलापूरमध्ये वाहतूक विभागाने गेल्या तीन-चार वर्षांपासून वाहतुकीच्या समस्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून, अवैधरीत्या उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी व रिक्षांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही शहरांतील सुजाण नागरिकांनी या कारवाईचे स्वागतही केले आहे. मात्र या शहरांतील चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यास वाहतूक विभागाचे पोलीस असमर्थ ठरल्याचे दिसून आले आहे. कारण चारचाकी वाहनांना हटविण्यासाठीचे टोईंग वाहनच अंबरनाथच्या वाहतूक विभागाकडे उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मिळेल त्या जागी चारचाकी वाहने शहरात उभी केल्याने त्यांचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.
विशेषत: बदलापूर व अंबरनाथ या नगरपालिकांच्या समोर नगरसेवक, ठेकेदार, उद्योगपतींची वाहने बिनदिक्कत उभी राहत आहेत. मात्र या वाहनांवर अद्यापही कारवाई झालेली नाही. यामुळे या दोन्ही नगरपालिकांसमोर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र आम्ही रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी दुचाकी उभ्या केल्या, की त्यावर पोलिसांकडून कारवाई होते, असे एका दुचाकी चालकाने सांगितले.
काळ्या काचा, नावाच्या नंबर प्लेट लावणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे, मात्र वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या चारचाकी वाहने ‘टोईंग’ करण्यासाठी वाहन नसल्याने कारवाई करू शकत नाही, तरी ही वाहने उभी राहू नयेत यासाठी आमच्याकडून दक्षता निश्चितच घेण्यात येईल.
– गौतम कांबळे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग
